'बंद'मुळे काश्‍मीरमध्ये निर्बंध

पीटीआय
शनिवार, 17 जून 2017

सहा पोलिसांची हत्या हे दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.
- अरुण जेटली, संरक्षणमंत्री

अतिरिक्त तुकड्या तैनात; शाळा-महाविद्यालये बंद

श्रीनगर: सुरक्षा जवानांच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत येथील फुटीरतावाद्यांनी "बंद' पुकारला असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून काश्‍मीर खोऱ्यातील अनेक भागांमध्ये हालचालींवर निर्बंध आणण्यात आले. श्रीनगर, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पोलिस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवरही या भागांमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सावध झाल्या आहेत. संवेदनशील असलेल्या दक्षिण काश्‍मीरमध्ये आज अनेक दुकाने बंद होती; तसेच शाळा-महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. पोलिस आणि जवानांच्या अतिरिक्त तुकड्या या भागांत तैनात करण्यात आल्या होत्या. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर येथे शोधमोहीम राबविली जात आहे. दहशतवाद्यांच्या एका गटाने काल (ता. 16) अनंतनाग जिल्ह्यातील अचाबल येथे पोलिस पथकावर बेछूट गोळीबार केल्याने सहा पोलिसांना हौतात्म्य आले होते. नंतर शस्त्रे पळवून नेतानाच दहशताद्यांनी पोलिसांची चेहरे विद्रूप करून विटंबनाही केली. हे सर्व दहशतवादी पाकिस्तानस्थित लष्करे तैयबा या संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे. चकमकीत मारला गेलेला दहशतवाद्यांचा स्थानिक म्होरक्‍या जुनैद मट्टू याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांवर अंत्यसंस्कार
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिसांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस अधिकारी फिरोज अहमद दर आणि इतर पाच जण या हल्ल्यात हुतात्मा झाले होते. दर (वय 32) यांना त्यांच्या कुटुंबाच्या परंपरागत दफनभूमीत दफन करण्यात आले. या वेळी त्यांचे अनेक सहकारी आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.

Web Title: jammu-kashmir news