'जीएसटी'विरोधात काश्‍मीर "बंद'

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

एक देश, एक कराला आमचा विरोध आहे. या नव्या कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, यासाठी आम्हाला जीव गमवावा लागला तरी चालेल. विशेष दर्जा आम्ही नाहीसा होऊ देणार नाही.

- महम्मद यासिन खान, अध्यक्ष, केटीएमएफ

व्यापारी, व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद; श्रीनगरमध्ये जमावबंदी आदेश

श्रीनगर: वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) विरोधात जम्मू आणि काश्‍मीर राज्यातील दुकाने आणि व्यावसायिक संस्था शनिवारी मोठ्या प्रमाणात बंद होत्या. श्रीनगरमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
काश्‍मीर ट्रेडर्स ऍण्ड मॅन्युफॅक्‍चरर्स (केटीएमएफ) संघटनेने हा बंद पुकारला होता. घटनेच्या कलम 370 मुळे राज्याला मिळालेला विशेष दर्जा नव्या कर पद्धतीमुळे जाण्याची भीती व्यापारी आणि विरोधी पक्षांनी व्यक्त केली. राज्यभरात बंद पाळण्यात आला तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळित सुरू होती. बंद पुकारण्याची घोषणा "केटीएमएफ'ने काल केली होती. सध्याच्या स्वरुपातील जीएसटीमुळे राज्याची वित्तीय स्वायत्तता कमी होणार असून, हे राज्यातील जनतेसाठी स्वीकारार्ह नाही, असे संघटनेने म्हटले आहे.

संघटनेने म्हटले आहे, की जीएसटीच्या अंमलबजावणीला विरोध करण्यासाठी खोऱ्यातील व्यावसायिक कितीही प्रमाणात तोटा सहन करण्यास तयार आहेत. सध्याच्या स्वरुपातील कायदा ते राज्यात लागू होऊ देणार नाहीत. जम्मू आणि काश्‍मीर राज्याच्या विशेष दर्जात दुरुस्ती करण्याच्या तरतुदीला आमचा विरोध राहील. जीएसटीविरोधात लाल चौकात धरणे धरणार असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: jammu-kashmir news gst and kashmir bandh