'जेकेएलएफ'चा म्होरक्‍या यासिन मलिकला अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर "एनआयए'चे छापासत्र सुरूच

फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर "एनआयए'चे छापासत्र सुरूच

श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेते आणि दहशतवादी संघटनांना पैसा पुरवणाऱ्या संशयित उद्योजकांच्या घरांवर राष्ट्रीय शोध संस्थेचे (एनआयए) छापासत्र सुरूच आहे. हुर्रियत कॉन्फरन्सचा सय्यद अली शाह गिलानी, मिर्झावइझ मौलवी ओमर फारूख आणि जम्मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) म्होरक्‍या महंमद यासिन मलिक या फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर छापे टाकले. या वेळी यासिन मलिक याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर फुटीरतावादी नेते, व्यापारी आणि इतरांच्या घरांवर छापे टाकून "एनआयए'कडून छळ केला जात असल्याचा आरोप फुटीरतावादी नेत्यांनी केला आहे. हे तिघेही येत्या नऊ सप्टेंबरला "एनआयए'च्या नवी दिल्लीतील मुख्यालयात हजर होणार होते.

"एनआयए"ने आज हुर्रियत कॉन्फरन्सचा म्होरक्‍या आगा सय्यद हसन याच्या बडगाम येथील घरावर छापा टाकला. या वेळी तेथील सर्व परिसरात केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, "एनआयए'ने काश्‍मीर उच्च न्यायालय बार असोसिएशनचा अध्यक्ष ऍड. मिआन अब्दुल क्वय्युम याला नवी दिल्ली येथून घेऊन काल (ता. 6) काश्‍मीर व्हॅली, श्रीनगर, दिल्ली येथील उद्योजकांच्या घरांवर छापे टाकले. दिल्ली आणि काश्‍मीर खोऱ्यातील अनेक व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. श्रीनगरमधील आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले. दहशतवाद्यांना पैसा पुरवल्या प्रकरणी दहशतवाद्यांचे म्होरके आणि उद्योजकांना "एनआयए'ने अटक केली आहे. यामध्ये हुर्रियत कॉन्फरन्सचा प्रवक्ता अय्याझ अकबर आणि ऍड. शाहिदुल इस्लाम यांचाही समावेश आहे.

Web Title: jammu-kashmir news jklf commander Yasin Malik arrested