राजनाथसिंह काश्‍मीर दौऱ्यावर; मेहबूबा मुफ्तींशी चर्चा

वृत्तसंस्था
रविवार, 10 सप्टेंबर 2017

राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा

श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे आज श्रीनगरमध्ये आगमन झाले. सर्व पर्याय खुले ठेवून मी काश्‍मीरमध्ये आलो आहे. मतभेद चर्चेद्वारे सुटू शकतात यावर विश्वास असणाऱ्या सर्वांना आपण भेटणार असून, त्यांची मते जाणून घेणार असल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.

राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा

श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे आज श्रीनगरमध्ये आगमन झाले. सर्व पर्याय खुले ठेवून मी काश्‍मीरमध्ये आलो आहे. मतभेद चर्चेद्वारे सुटू शकतात यावर विश्वास असणाऱ्या सर्वांना आपण भेटणार असून, त्यांची मते जाणून घेणार असल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.

श्रीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर राजनाथसिंह यांनी जम्मू आणि काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. काश्‍मीरमध्ये मागील महिन्यात उसळलेल्या हिंसाचारात 27 दहशतवादी ठार झाले होते, तर सुरक्षा दलांचे अनेक जवान हुतात्मा झाले होते. काही सर्वसामान्य नागरिकही मृत्युमुखी पडले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थिती सामान्य करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर मेहबूबा मुफ्ती आणि राजनाथसिंह यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्‍मीरसाठी 2015मध्ये जाहीर केलेल्या 80 हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचीही माहिती घेतली. या प्रकल्पांच्या कामांचा वेग वाढवावा, कारण त्यामुळे राज्यातील रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असे राजनाथसिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. राजनाथसिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पाककडून शस्त्रसंधीचा भंग
पूँच जम्मू ः काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आज शस्त्रसंधीचा भंग करण्यात आला. पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पूँच जिल्ह्यात मेंधार सेक्‍टरमध्ये देबराज, कृष्णा घाटी आणि इशापूर भागात सीमेपलीकडून जोरदार गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यास भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. राजनाथसिंह यांच्या काश्‍मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

सोपोरमध्ये दहशतवादी ठार
उत्तर काश्‍मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या घटनेनंतर हिंसाचार उसळला असून, स्थानिक नागरिकांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक केल्याचे सांगण्यात आले. सोपोरमधील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली असून, शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाई उशिरापर्यंत सुरू होती, असे सांगण्यात आले.

Web Title: jammu-kashmir news Rajnath Singh visits Kashmir