दहशतवाद्यांनी जवानाची घरात घुसून केली हत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

दहशतवादी रात्री रमीज यांच्या घरात घुसले आणि अंदाधुंद गोळीबार केला.

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील हज्जान भागात दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री सीमा सुरक्षा बलाच्या (BSF) जवानाच्या घरात घुसून त्याची हत्या केली. तसेच, या जवानाच्या कुटुंबातील चारजणांना जखमी केले आहे. रमीज पारी असे या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. 

BSFच्या 73 व्या बटालियनमध्ये तीसवर्षीय रमीज यांनी सहा वर्षे देशसेवा केली. दहशतवादी रात्री रमीज यांच्या घरात घुसले आणि अंदाधुंद गोळीबार करू लागले, असे पोलिसांनी सांगितले. 

या हल्ल्यात जवान रमीज यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर रमीज यांचे वडील, दोन मुलगे आणि चुलती हे चौघे जखमी झाले. रमीज यांच्या चुलतीची प्रकृती गंभीर असून, इतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. जम्मू काश्मीर पोलिसांचे महासंचालक एस.पी. वैद्य यांनी ही घटना हिंस्र व अमानूष असल्याचे म्हटले आहे. यातील दोषींना शिक्षा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

यापूर्वी, 9 मे रोजी काश्मीरमधील लष्करी अधिकारी उमर फैयाज यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते, आणि त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. 
 

Web Title: jammu kashmir news terrorists kill bsf jawan at home