जम्मू काश्‍मीरमध्ये रेल्वेसेवा सुरू

पीटीआय
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर स्थगित झालेली काश्‍मिरातील रेल्वेसेवा तीन महिन्यांच्या कालखंडानंतर आज सुरू झाली. तसेच बटवारा-बटामालू मार्गावर मिनीबस सेवा सुरू झाली असून, जिल्हांतर्गत कॅब आणि ऑटोरिक्षा सेवाही पूर्ववत होत असल्याचे चित्र आहे. काश्‍मीर खोऱ्यात काही भागात खासगी वाहने धावताना दिसल्या.

श्रीनगर - जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर स्थगित झालेली काश्‍मिरातील रेल्वेसेवा तीन महिन्यांच्या कालखंडानंतर आज सुरू झाली. तसेच बटवारा-बटामालू मार्गावर मिनीबस सेवा सुरू झाली असून, जिल्हांतर्गत कॅब आणि ऑटोरिक्षा सेवाही पूर्ववत होत असल्याचे चित्र आहे. काश्‍मीर खोऱ्यात काही भागात खासगी वाहने धावताना दिसल्या. 

आज सकाळी बारामुल्ला ते श्रीनगरदरम्यान रेल्वेच्या दोन फेऱ्या झाल्या. सुरक्षेच्या कारणावरून सकाळी १० वाजता आणि दुपारी ३ वाजता रेल्वे सोडण्यात आली. जम्मू काश्‍मीरमधील अघोषित बंदमुळे रेल्वेने सेवा स्थगित केली होती. मात्र, सोमवारपासून रेल्वेने ही सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले. काल रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती. सुरक्षेची हमी मिळाल्यानंतर बारामुल्ला-श्रीनगर रेल्वे सुरू झाली. तसेच श्रीनगर-बनिहालदरम्यानच्या रेल्वेमार्गाची तपासणी झाल्यानंतर तेथे रेल्वे सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, आज अघोषित बंदच्या शंभराव्या दिवशी श्रीनगरमध्ये सकाळी बाजारपेठ सुरू झाली. मात्र, दुपारी पुन्हा दुकाने बंद करण्यात आली. दहशतवाद्यांकडून दुकाने बंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना धमकावले जात असल्याचे सुरक्षा दलाने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu kashmir railway service start