काश्‍मीर खोरे ९९ व्या दिवशीही विस्कळित

पीटीआय
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

काश्‍मिरात हजारो वाहने अडकली
रामबन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने आज दुपारी जम्मू ते श्रीनगर महामार्ग बंद झाला. आज पहाटे या मार्गावर अडकलेल्या काही वाहनांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर महर क्षेत्रात पुन्हा भूस्खलन झाल्याने वाहने थांबविण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. राजौरी आणि पूँच तसेच शोपियाँला जोडणारा मुगल रोडही चौथ्या दिवशी बंद राहिला. श्रीनगर-जम्मू रस्त्यावर शंभर मीटरपर्यंत बर्फ साचल्याने ते बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

श्रीनगर - अयोध्या प्रकरणाचा निकाल आणि इद मिलाद उन नबीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हजरतबल दर्ग्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जम्मू काश्‍मीरमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. दरम्यान, जम्मू काश्‍मीर खोऱ्यातील जनजीवन ९९ व्या दिवशीही विस्कळित राहिले. बाजारपेठ आज सकाळी काही तासांसाठी खुली झाली होती, मात्र दुपारी ती बंद झाली.

हजरतबाल दर्गा येथे हजारोंच्या संख्येने नागरिक येतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात दक्षता बाळगली जात आहे. ईदनिमित्त होणारी गर्दी पाहता विशेष काळजी घेतली आहे. जम्मू काश्‍मीर खोऱ्यात कलम ३७० हटविल्यानंतर विस्कळित झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. आज सकाळी श्रीनगर येथील लालचौक येथे व्यापारी संकुलातील दुकाने काही काळासाठी सुरू झाले. मात्र दुपारनंतर दुकाने बंद करण्यात आली. संडे मार्केट नावाने बाजार आज टीआरसी चौक-लाल चौक येथे भरला होता. तेथे अनेक फेरीवाले दिसून आले. सार्वजनिक वाहतूक तुरळक दिसत होती. प्रि-पेड मोबाईल आणि इंटरनेट सेवा अद्याप बंदच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu kashmir supreme court