बनिहालमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक

पीटीआय
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

बनिहाल/जम्मू  : जम्मू-काश्‍मीरमधील बनिहाल पट्ट्यात सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी आज अटक केली.

बनिहाल/जम्मू  : जम्मू-काश्‍मीरमधील बनिहाल पट्ट्यात सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी आज अटक केली.

बुधवारी (ता. 20) झालेल्या या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला होता. गझनफर आणि आरिफ अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी बनिहाल भागात तत्काळ शोधमोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान गझनफर आणि आरिफ पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून दोन रायफल आणि हल्ल्यादरम्यान जवानांकडून हिसकावून घेतलेली आणखी एक रायफल जप्त करण्यात आली. हे दोघे दहशतवादी चिनाब खोऱ्यामध्ये दहशत पसरवित होते. "एसएसबी'वरील हल्ल्यातील तिसरा दहशतवादी अकीब वाहिदचा शोध अद्याप सुरू आहे.

दरम्यान, जम्मू आणि सांबा जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफगोळ्यांचा मारा सुरू केला असून, यामध्ये अडकलेल्या 747 जणांना पोलिसांनी सुरक्षितरित्या बाहेर काढले. पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करी ठाणी आणि सीमेवरील गावांना लक्ष्य केले आहे. कालपासून (ता. 21) सुरू असलेल्या या हल्ल्यात सहा नागरिक जखमी झाले आहेत. भारताने केलेल्या गोळीबारात सहा पाकिस्तानी नागरिक मारले गेल्याचा दावा पाकिस्ताननेही केला आहे.

Web Title: jammu-kashmir two terrorist arrested