मित्रपक्ष जेडीयूकडून भाजपला आणखी एक धक्का

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

नितीश कुमार यांच्या जनता दल(यू) जेडीयू पक्षाने भाजपला आज अजून एक धक्का दिला आहे. भाजपशी असलेली आघाडी केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवताना बिहारबाहेर सर्व ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा जेडीयूने केली आहे.

पाटणा: नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात सहभागी न झालेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल(यू) जेडीयू पक्षाने भाजपला आज अजून एक धक्का दिला आहे. भाजपशी असलेली आघाडी केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवताना बिहारबाहेर सर्व ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा जेडीयूने केली आहे.

जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक आज पाटणा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर जेडीयूने एनडीएतील आपल्या सहभागाबाबत मोठी घोषणा केली आहे. भाजपसोबतची एनडीएमधील आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवण्याची आणि बिहारबाहेर एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम न करण्याची घोषणा जेडीयूने केली. त्यामुळे जेडीयू आणि भाजपाची आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित राहणार आहे.

बिहारबाहेर जेडीयू स्वबळावर निवडणुका लढणार आहे. आगामी वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा, दिल्ली आदी राज्यात जेडीयू स्वबळावर लढणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janata Dal United not to be part of NDA outside Bihar