जावडेकरांनी दिला श्रमप्रतिष्ठेचा धडा

जावडेकरांनी दिला श्रमप्रतिष्ठेचा धडा

नवी दिल्ली - राजधानीतील ल्यूटन्स झोनमध्ये राहणाऱ्या "व्हीव्हीआयपी' मंडळींना त्यांच्या आलिशान बंगल्यांच्या आत-बाहेरचा परिसर रोज सकाळी स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांबद्दल, बंगल्याच्या रक्षणासाठी 24 तास पहारा देणाऱ्या जवानांबद्दल, फारशी आस्था नसते हा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र या वस्तुस्थितीला छेद देऊन एका केंद्रीय मंत्र्यांनी या साऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या निवासस्थानी सन्मानाने बोलावून त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी केली... मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे त्यांचे नाव. जावडेकर यांचे हे स्नेहशील रूप रोज पाहायला मिळावे, अशी प्रार्थना त्यांच्या स्टाफसह या साऱ्या श्रमिकांनी नक्कीच केली असणार!
जावडेकर यांनी या श्रमिकांबरोबर दिवाळी साजरी करताना त्यांच्यासह फराळाचा आस्वाद घेतला व गप्पाही मारल्या."पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या अंत्योदय कल्पनेचा एक भाग म्हणजे आजचा हा उपक्रम होय,' असे जावडेकर यांनी "सकाळ'ला सांगितले. ते म्हणाले, की श्रमप्रतिष्ठेचे तत्त्व केवळ भाषणांत सांगून भागणार नाही. आपले जीवन सुकर करण्यासाठी जे श्रमिक काम करतात त्यांचे जीवन सुकर व्हावे यादृष्टीने असे छोटेछोटे उपक्रम त्यांचा हुरूप वाढविणारे ठरतात. सर्वांनीच या श्रमिकांची सणासुदीला आठवण ठेवली पाहिजे. यातूनच सामाजिक समरसता वाढेल. समरसता की समता, पृच्छेवर यावर जावडेकर यांनी, "दोन्हीही तत्त्वे एकच आहेत व त्यात काडीचाही फरक नाही,' असे ठासून सांगितले. एखादा विद्यार्थी रिक्षाने जात असेल तर त्याला रोज शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्या काकांना पालकांकडून आधी सन्मानाने वागणूक मिळायला हवी. म्हणजे ते संस्कार मुलात उतरतील, असेही ते म्हणाले.
जावडेकर यांना पावणेतीन वर्षांपूर्वी केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावर कुशक रस्त्यावरील सहा क्रमांकाचा अलिशान बंगला मिळाला आहे. महादेव रस्त्यावर असल्यापासून ते रोज सकाळी फिरायला जातात. दिल्लीतील टोकाचा उन्हाळा असो की टोकाची थंडी, सकाळी सकाळी नित्यनेमाने रस्ते झाडणारे, कचरा उचलणारे, तसेच वृत्तपत्रे टाकणारी मुले यांच्याशी ते आवर्जून संवाद साधतात. बंगल्याच्या आवारातील झाडांची निगराणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही रोज सकाळचा चहा जावडेकर यांच्या घरातूनच जातो. शिक्षण मंत्रिपदी बढती मिळाल्यावर जावडेकर यांनी पहिला पेढा यातील कर्मचाऱ्यालाच दिला होता. या अनुषंगानेच त्यांनी आज हा उपक्रम राबविला.

जवानांना शुभेच्छा
सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना देशवासीयांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार जावडेकर यांनी जवानांना शुभेच्छांचा फलक तयार केला व त्यावर याऱ्या सत्कारार्थी श्रमिकांकडून शुभेच्छा संदेश लिहून घेतले. यातील अनेकजणांची भाषा वेगवेगळी होती. साहजिकच या फलकाचे स्वरूपही "विविधतेत एकता' असे बनले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com