शबाना आझमी - जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी महोत्सवाला फिरवली पाठ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

23 व 24 फेबुवारीला होणाऱ्या या महोत्सवासाठी हा दोन दिवसांचा कराची दौरा मात्र पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून त्यांनी रद्द केला आहे.

पुलवामा येथील लष्कराच्या बसवर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात देशभर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मिडीयावरुन आपला संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ संगीतकार, कवी, लेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.

हे दांम्पत्य एका साहित्य महोत्सवानिमित्त पाकिस्तानात जाणार होते. कराची आर्ट कॉन्सिलकडून जावेद अख्तर व शबाना आझमी यांना महोत्सवाचे आमंत्रण आले होते. 23 व 24 फेबुवारीला होणाऱ्या या महोत्सवासाठी हा दोन दिवसांचा कराची दौरा मात्र पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून त्यांनी रद्द केला आहे.

दोघांनीही आपल्या ट्विटर अकाउंट वरुन याबाबत लिहीले आहे. अख्तर यांनी ट्विट करत हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहिली आहे व कराची साहित्य महोत्सवात जाण्याचा निर्णय रद्द केल्याची माहिती दिली आहे. ‘सीआरपीएफ जवानांविषयी माझ्या मनात आदर आहे. मी त्यांच्यासाठी एकदा गाणंही लिहिलं होतं. काही सीआरपीएफ जवानांना मी प्रत्यक्षातही भेटलो आहे त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.’ असे अख्तर यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे.
 

 

Web Title: Javed Akhtar and Shabana Azmi Canceled a Invitation From Pakistan because of Pulwama Terror Attack