काश्मीरमध्ये जवानांशी गैरवर्तन; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना स्थानिकांनी जवानांशी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना स्थानिकांनी जवानांशी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

काश्मीरमध्ये पोटनिवडणूकीच्या बंदोबस्तावरून केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान एव्हीएम घेऊन परतत होते. यावेळी स्थानिक फुटीरतावादी टोळक्याने जवानांशी गैरवर्तन केले आहे. सशस्त्र असलेल्या जवानांनी संयम पाळत आपले कर्तव्य पार पाडण्याकडे लक्ष दिले. परंतु, या टोळक्यांच्या विरोधात नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये जवान नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करत आहेत. मात्र, हेच नागरिक जवानांसोबत गैरवर्तन करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गैरवर्तन करणाऱयांनीच व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर अपलोड केला आहे.

श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना छेडण्याबरोबरच मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर मनात संताप आल्याशिवाय राहणार नाही. ज्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जवान अहोरात्र लढत आहेत, त्याच नागरिकांकडून जवानांना मारहाण होत असल्यामुळे आपला नेमका शत्रू कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
संबंधित व्हिडीओत जवान मतदान केंद्रावरुन एव्हीएम घेऊन परतत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी काही तरुण या जवानांवर हल्ला करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहेत. शिवाय, देश विरोधात घोषणा देताना दिसतात. एकाने तर जवानाचे हेल्मेट फेकून दिले आहे. सशस्त्र असूनही जवान कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे चालताना दिसतात.

'जवानांसोबत गैरवर्तवणूक होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जवानांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही', असे सीआरपीएफचे प्रवक्ते भवनेश कुमार प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 'जवानांनी एव्हीएमच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी जो संयम दाखवला तो कौतुकास्पद आहे. असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटले आहे.

Web Title: Jawan, Slapped And Kicked By Mob In Srinagar, Video viral