"अम्मां'ची प्राणज्योत मालवली;तमिळनाडू शोकग्रस्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्‍वभूमीवर तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई व राज्याच्या इतर भागामध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जयललिता यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही अधिक काटेकोर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयामधील पक्षाचा ध्वज अर्ध्यावर आणण्यात आला.

चेन्नई - तमिळनाडू राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्री व ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता यांची प्राणज्योत आज (सोमवार) अखेर मालविली. त्या 68 वर्षांच्या होत्या.

तमिळनाडू व एकंदरच देशाच्या राजकारणामधील अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या जयललिता यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मानले जात आहे.

जयललिता यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तातडीने येथील अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना वाचविण्यासाठी अपोलो व एम्समधील वैद्यकीय तज्ज्ञांचे उच्चस्तरीय पथक युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. मात्र अथक प्रयत्नांनंतर जयललिता यांनी रात्री ११.३० च्या सुमारास अखेरचा श्‍वास घेतल्याचे निष्पन्न झाले. अपोलो हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिन काढून जयललिता यांच्या निधनाची माहिती दिली. 

जयललिता यांच्यासाठी शक्‍य ती सर्व उत्तमोत्तम वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्याचे इंग्लंडमधील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रिचर्ड बेल यांनी स्पष्ट केले होते. जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असली; तरी त्यांना वाचविण्यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न करण्यात आल्याचे बेल यांनी म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर, तमिळनाडूच्या राज्यपालांसहित राज्य व देशपातळीवरील अनेक राजकीय नेत्यांनी जयललिता यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयास भेट दिली होती.

जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्‍वभूमीवर तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई व राज्याच्या इतर भागामध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जयललिता यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही अधिक काटेकोर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयामधील पक्षाचा ध्वज अर्ध्यावर आणण्यात आला.

याआधी, अपोलो रुग्णालयाबाहेर पक्षाचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अशांत कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. रुग्णालयाबाहेर जयललिता यांच्या समर्थकांपैकी अनेक जण भावनिक झाल्याचे आढळून आले. जयललिता यांच्या चिंताजनक प्रकृतीच्या पार्श्‍वभूमीवर चेन्नई शहरात अस्वस्थता व तणाव असल्याने विद्यार्थी व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना दुपारीच घरी जाण्याचे निर्देश देण्यात आले होते.

जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडूच्या राजकारणास नवे वळण मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली असून देशपातळीवरही या घटनेचे मोठे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Jayalalithaa no more; Tamil Nadu in grief