जयललिता यांना ढकलून दिल्यानेच त्या बेशुद्ध- पी. एच. पांडियन

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत अण्णा द्रमुकचे ज्येष्ठ नेते पी. एच. पांडियन यांनी संशय व्यक्त केला आहे. जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी "पोएस गार्डन' या त्यांच्या निवासस्थानी भांडण झाले होते. त्या वेळी जयललिता यांना ढकलून देण्यात आले, त्यातच त्या बेशुद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी केला

चेन्नई-  तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत अण्णा द्रमुकचे ज्येष्ठ नेते पी. एच. पांडियन यांनी संशय व्यक्त केला आहे. जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी "पोएस गार्डन' या त्यांच्या निवासस्थानी भांडण झाले होते. त्या वेळी जयललिता यांना ढकलून देण्यात आले, त्यातच त्या बेशुद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी केला. शशिकला यांच्या मुख्यमंत्रिपदालाही त्यांनी विरोध केला आहे. पांडियन यांच्या आरोपामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

पांडियन हे विधानसभेचे माजी सभापती आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ""जयललिता यांचा मृत्यू ही अनैसर्गिक घटना आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या घटनेचीही चौकशी करायला पाहिजे. 22 सप्टेंबर रोजी रात्री जयललिता यांच्या घरी शाब्दिक वाद झाला. जयललिता व शशिकला यांच्या कुटुंबीयात काही कारणावरून हा वाद झाला. त्या वेळी जयललिता यांना ढकलून देण्यात आले. त्यामुळे त्या खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. त्यामुळे त्यांना त्या रात्रीच अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.''

ते म्हणाले, ""जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या घटनाक्रमाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्या वेळी घरात उपस्थित असलेल्या व्यक्तीचींही चौकशी करावी. रुग्णालयाला कदाचित पेशंटची खासगी माहिती देण्यात अडचणी असतील; मात्र घरातील कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे स्वतःचा बचाव करू शकत नाही.''

जयललिता यांचा मृत्यू झाल्याने आपण इतके दिवस शांत राहिलो. मात्र तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांतील घटना पाहिल्यानंतर मी अस्वस्थ झालो आणि त्यामुळे जयललिता यांच्या मृत्यूबाबत खरी माहिती सांगण्यास भाग पडल्याचे त्यांनी नमूद केले. जयललिता यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचे, तसेच चुकीचे उपचार झाले नसल्याचे स्पष्टीकरण कालच अपोलो रुग्णालय व सरकारने केले होते.

शशिकला यांच्या मुख्यमंत्रिपदालाही पांडियन यांनी विरोध केला, ते म्हणाले, ""पक्षात शशिकला यांना कोणतेही स्थान नाही. त्यांची निवड पक्षाच्या नियमांविरुद्ध आहे. केवळ केडरच सरचिटणीसांची निवड करू शकते.''

Web Title: Jayalalithaa's death was not natural