काँग्रेसला वाचविण्यासाठी जेडीएसचे प्रयत्न : पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची स्तुती केली होती. मात्र, त्यांनी आता काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात पडद्यामागे छुपी युती असल्याचा आरोप केला.

नवी दिल्ली : "धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) हा पक्ष कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला वाचविण्यासाठी मदत करत आहे. जेडीएस काँग्रेसला पराभूत करु शकत नाही. काँग्रेसला जर कर्नाटक निवडणुकीत कोण पराभूत करणार असेल तर तो भाजप आहे" असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टुमकुरु येथील प्रचारसभेत सांगितले.  

पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची स्तुती केली होती. मात्र, त्यांनी आता काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात पडद्यामागे छुपी युती असल्याचा आरोप केला. काँग्रेसने ते लपवून ठेवता कामा नये, त्यांनी लोकांना असलेल्या या छुप्या युतीबद्दल स्पष्टपणे बोलायला हवे, असेही ते म्हणाले.

गेल्या वर्षी बंगळूरु महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएसच्या झालेल्या युतीची आठवणही पंतप्रधान मोदी यांनी करुन दिली. कर्नाटकातील दुसऱ्या भागात हे दोन पक्ष जरी एकमेकांच्या विरोधात दिसत असले तरी ते महापालिकेच्या निवडणुकीमध्ये छुपी युती करतात, मग नेमका यांच्यात कुठला करार झाला आहे. या दोन पक्षामध्ये नेमके काय चालले आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

जेडीएस हा पक्ष कर्नाटकमधील तिसरा महत्वाचा पक्ष आहे. त्यामुळे तो काँग्रेसला छुप्या प्रकारे मदत करुन 'किंगमेकर'ची भूमिका बजावू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: JDS working to save Congress in Karnataka elections says PM Modi