मुलीच्या भूकबळीप्रकरणी मंत्र्याने सरकारलाच ठरविले दोषी 

उज्ज्वल कुमार
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

"भाजप सरकार ब्रॅंडिंगवर चालते' 
"झारखंडमधील भाजप सरकारला सत्तेवर येऊन हजार दिवस झाल्याने त्याचा जल्लोषात ते मग्न असून सामान्य लोक भुकेने मरत आहेत,' अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. विरोधी पक्षाचे नेते हेमंत सोरेन म्हणाले, "" या घटनेवरून स्पष्ट झाले आहे की, भाजप सरकार केवळ ब्रॅंडिंगवर चालत आहे.'' झारखंडसाठी निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री रघुवर दास नुकतेच जपान आणि चेक प्रजासत्ताक या देशांचा दौरा करून आले आहे. 

पाटणा/ रांची : भुकेमुळे 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर झारखंडमध्ये राजकीय वादळ उठले आहे. मुख्यंमत्री रघुवर यादव यांच्या सरकारमधील अन्नपुरवठामंत्री शरयू राय यांनी "मुलीच्या कुटुंबीयांच्या नावाने आधार कार्ड नसल्यानेच त्यांचे नाव स्वस्त धान्य योजनेतील लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात आले आहे, असल्याचे स्पष्टीकरण देत सरकारलाच दोषी ठरविले आहे. 

राज्यातील सिमडेगा येथील करीमती गावात संतोषी नावाच्या 11 वर्षांचा मुलीचा बुधवारी (ता.17) भुकेमुळे मृत्यू झाल्याची घटना घटली. या मुलीच्या कुटुंबाला सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनेक महिन्यांपासून धान्य मिळत नव्हते. संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी अनेक वेळा आपली व्यथा मांडली आहे. मात्र, सर्वांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पोटात दुखत असल्याने संतोषीला 27 सप्टेंबरला सिमडेगा येथील सदर रुग्णालयात दाखल केले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू मलेरियामुळे झाल्याचे कारण दिले. संतोषीचा भूकबळी गेल्याने संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. घरात अन्नान्न दशा असल्याने आपल्या छोट्या दोन मुलांचेही संतोषीसारखे हाल होऊ नयेत, यासाठी तिची आई कोईलीदेवी गाव सोडून भावाच्या घरी गेली होती. आज सकाळीच सासू तिला पुन्हा घेऊन आली. 

दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे शरयू राय यांनी सांगितले. "जर या कुटुंबाचे नाव स्वस्त धान्य योजनेत "लिंक' केले गेले नसेल, तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शिधापत्रिका आधार कार्डाशी "लिंक' केली नसेल तर संबंधित कुटुंबाला रेशनवरील धान्य मिळणार नाही, असा आदेश मुख्य सचिवांनी काढला असून, त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत,'' असे त्यांनी सांगितले. 

"भाजप सरकार ब्रॅंडिंगवर चालते' 
"झारखंडमधील भाजप सरकारला सत्तेवर येऊन हजार दिवस झाल्याने त्याचा जल्लोषात ते मग्न असून सामान्य लोक भुकेने मरत आहेत,' अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. विरोधी पक्षाचे नेते हेमंत सोरेन म्हणाले, "" या घटनेवरून स्पष्ट झाले आहे की, भाजप सरकार केवळ ब्रॅंडिंगवर चालत आहे.'' झारखंडसाठी निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री रघुवर दास नुकतेच जपान आणि चेक प्रजासत्ताक या देशांचा दौरा करून आले आहे. 

Web Title: Jharkhand child’s death: Union Food Ministry initiates inquiry, asks state government for report