मुलांच्या अपहरणाच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत चौघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

लहान मुलांचे अपहरण करत असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जमशेदपूर (झारखंड) : लहान मुलांचे अपहरण करत असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात लहान मुलांचे अपहरण होत असल्याची अफवा पसरली आहे. गुरुवारी राजनगर येथील बागबेडाजवळील नागाडीह येथील स्थानिकांना लहान मुलांच्या अपहरणाच्या टोळी आल्याचा संशय आला. त्यामुळे मोठ्या जमावाने एका समूहावर हल्ला केला. समूहाकडे चारचाकी वाहने होती. एकूण सात जणांचा समूहा होता. त्यापैकी चार जण मोटारीत बसले होते. हल्ल्याच्या उद्देशाने जमाव येत असल्याचे पाहून मोटारीतील तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र एक जण जमावाच्या हाती लागला. तर अन्य तीनजणही जमावाला सापडले. त्यामुळे मोठ्या जमावाने केलेल्या जबर मारहाणीत चारही जणांचा मृत्यू झाला. जमावाने मोटारीही जाळून टाकल्या. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचले. मात्र संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचे वाहनही पेटवून दिले.

'मोटारीतून मुले चोरणारे लोक जात असल्याचा स्थानिकांना संशय आला. त्यामुळेच त्यांनी हल्ला केला आणि त्यांच्या मोटारी जाळल्या', अशी माहिती पोलिस अधिकारी मणी कांत यांनी दिली.

Web Title: Jharkhand: Four lynched to death over suspicion of kidnapping children