सोशल मीडियावरून पाकची काश्‍मिरींना चिथावणी

पीटीआय
शुक्रवार, 31 मार्च 2017

लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जेथे चकमक घडत असेल, तेथील आसपासच्या गावातील युवक एकत्र येतात. दगडफेक करून दहशतवाद्यांना तेथून पळून जाण्यासाठी ते मदत करतात

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमधील चकमकीच्या ठिकाणी पोचून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान काश्‍मिरी युवकांना चिथावणी देत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत शुक्रवारी केला.

जम्मू-काश्‍मीरमधील बडगाम येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या वेळी जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन नागरिक मारले गेले. याबाबतचा मुद्दा काही सदस्यांनी आज सभागृहात उपस्थित केला. काश्‍मीर खोऱ्यातील स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मत तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य सौगत रॉय यांनी मांडले. त्यावर बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, तेथील दहशतवादाविरोधात लष्कर त्यांच्या पद्धतीने कारवाई करीत असून, त्यात नक्कीच यश मिळेल. लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जेथे चकमक घडत असेल, तेथील आसपासच्या गावातील युवक एकत्र येतात. दगडफेक करून दहशतवाद्यांना तेथून पळून जाण्यासाठी ते मदत करतात. हा नवा पायंडा आता या भागात पडत आहे. युवकांना चिथविण्यासाठी व्हॉट्‌सऍप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. जे गट काश्‍मिरी युवकांना भडकावण्याचे काम करीत आहेत, ते पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तान करीत असलेल्या चुकीच्या आवाहनाला युवकांनी भुलू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: J&K protesters influenced via social media groups run by Pak