पाक सैन्याच्या गोळीबारात 2 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
सोमवार, 1 मे 2017

या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये शिख रेजीमेंटच्या परमजीत सिंग आणि बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांचा समावेश आहे. आज सकाळी साडेआठपासून पाक सैन्याकडून गोळीबार सुरु होता.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पूँच जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. तर, तीन जवान जखमी आहेत.

पाकिस्तानी सैन्याने आज (सोमवार) सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूँच जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. तर, तीन जखमी असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याने गेल्या दोन महिन्यांत आठव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये शिख रेजीमेंटच्या परमजीत सिंग आणि बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांचा समावेश आहे. आज सकाळी साडेआठपासून पाक सैन्याकडून गोळीबार सुरु होता. पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाज्वा यांनी आज सकाळीच सीमेची पाहणी केली होती. त्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे. 

Web Title: J&K: Two soldiers killed as Pakistan fires rocket, violates ceasefire along LoC in Poonch