देशविरोधी घोषणा ; उमर खालिदची हकालपट्टी, कन्हैयाकुमारला दंड

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूला 9 फेब्रुवारी 2016 मध्ये फाशी देण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी त्यावेळी विद्यापीठ परिसरात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप ठेवण्यात आला.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात देशविरोधी घोषणा दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने उमर खालिद आणि कन्हैय्याकुमारवर कारवाई करण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार उमर खालिदची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली असून, जेएनयू विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैय्याकुमारला 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूला 9 फेब्रुवारी 2016 मध्ये फाशी देण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी त्यावेळी विद्यापीठ परिसरात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. याप्रकारानंतर सर्वच स्तरावरून टीका केली जात होती. त्यानंतर जेएनयू प्रशासनाने ऑक्टोबर 2017 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाला विद्यापीठातील 15 विद्यार्थ्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती.

तसेच या आरोपावरून कन्हैय्याकुमार आणि त्याचे दोन सहकारी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना अटकही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या तिघांनाही जामीन देण्यात आला होता. त्यावेळी कन्हैय्याकुमार 23 दिवस कारागृहात होता.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आत्तापर्यंत आरोपपत्र दाखल केलेले नाही. मात्र, कन्हैय्याकुमारला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. सध्या हे प्रकरण दिल्लीच्या विशेष पथकाकडे आहे.

Web Title: JNU panel upholds punishment for Umar Khalid and Kanhaiya