आसारामला दणका; बलात्कार प्रकरणी जोधपूर खंडपीठाने दुसऱ्यांदा फेटाळली याचिका

वृत्तसंस्था
Monday, 23 September 2019

अल्पवयीन मुलीवर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केल्याप्रकरणी आसारामला विशेष एससी-एसटी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

जोधपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी (ता.23) दणका दिला. बलात्कार प्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसारामने याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने आसारामला दणका दिला. न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार यांनी न्यायदानाचे काम केले.

यापूर्वीही आसारामची याचिका फेटाळण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आसारामने आणखीन एक याचिका राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुनावणी होणार आहे. 

अल्पवयीन मुलीवर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केल्याप्रकरणी आसारामला विशेष एससी-एसटी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उत्तर प्रदेशमधील शहाजहांपूर येथील एका अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर आसारामला अटक करण्यात आली होती.

सदर मुलीने अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी आसारामच्या मध्यप्रदेशात छिंदवाडा येथे असलेल्या आश्रमात प्रवेश घेतला होता. त्यानंतर आसारामने जोधपूरच्या मनाई भागातील आश्रमात तिच्यावर 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री तिच्यावर बलात्कार केला होता. आसारामचा मुलगा नारायण साई हादेखील बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला होता. बलात्कार, अनैसर्गित लैंगिक संबंध, धमकी आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुरतमधील दोन महिलांनी आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या : 

- सिंधुदुर्गातील बड्या राजकीय हस्तीची रिफायनरी परिसरात तीनशे एकर जागा 

- पिचडजी लक्ष ठेवा, गाठ अजित पवारांशी आहे

- HappyBirthdayTanuja : 75व्या वाढदिवशी काजोलने दिलं आई तनुजाला खास गिफ्ट!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jodhpur bench rejects Aasaram Bapus plea for second time