सरदारांवरील विनोदांवर बंदी अशक्‍य

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कोणी व्यवसायिक दृष्टिकोनातून अशा विनोदांचा वापर करीत असेल, तर त्याविरोधात पावले उचलणे शक्‍य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : पंजाबी सरदारांवर केल्या जाणाऱ्या विनोदांवर बंदी घालणे ही बाब अशक्‍यप्राय असल्याचे आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करत यास नकार दर्शविला. या विनोदांविषयी कोणास हरकत असल्यास त्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.

अशा प्रकारच्या विनोदांवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून, आज त्यावर न्यायाधीश दीपक मिश्रा, आर. भानुमती यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. न्यायालये नागरिकांसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे लागू करू शकत नाही. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कसे वर्तन करावे, याबद्दल कोणत्याही सूचना देणे ही बाब न्यायालयांच्या अखत्यारीत नसून, जरी तसे केल्यास त्याची अंमलबजावणी कोण करणार, असा प्रश्न न्यायालयाने सुनावणीदरम्यान उपस्थित केला.

या विनोदांचा विचार वैयक्तिक पातळीवर केल्यास कोणाला हसण्यापासून किंवा कोणताही भाव व्यक्त करण्यापासून अटकाव करणे शक्‍य नाही. कोणी व्यवसायिक दृष्टिकोनातून अशा विनोदांचा वापर करीत असेल, तर त्याविरोधात पावले उचलणे शक्‍य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 मार्च रोजी होणार आहे.

Web Title: Judgement On Sardar Jokes