न्यायपालिका स्वतंत्र आणि निडर राहावी

T S Thakur
T S Thakur

नवी दिल्ली - सध्याच्या काळात न्यायपालिका स्वतंत्र आणि निडर राहिली पाहिजे. या संस्थेसाठी मी सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. मी निवृत्त होत आहे; पण बाहेरही मी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेसाठी प्रार्थना करेन, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी व्यक्त केले. आपल्या कार्यकाळातील शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते.

देशात न्यायाधीशांची कमतरता आणि भारतीय समाजाची समग्रता लक्षात घेता लोकांच्या अपेक्षेला उतरणे गरजेचे आहे, असेही ते या वेळी म्हणाले. आता सरन्यायाधीशपदाची सूत्रे जे. एस. खेहर यांनी घेतली आहेत. आज त्यांचा शपथविधीही संपन्न झाला. तत्पूर्वी निरोपाच्या कार्यक्रमात ठाकूर यांनी वकील आणि न्यायाधीश अशा आपल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा उपस्थित वकिलांसमोर उलगडला. या वेळी नवे मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहरही उपस्थित होते.

ठाकूर म्हणाले, ""न्यायपालिकेसमोर अनेक आव्हाने आहेत. भविष्यात आणखी कठीण परिस्थितीचा सामनाही करावा लागणार आहे. सध्या 3 कोटी प्रलंबित प्रकरणे आहेत. न्यायाधीशांची संख्या अपुरी आहे. आगामी काळात आणखी गंभीर मुद्दे तुमच्यासमोर येतील. यात सायबर कायदा, मेडिको, जेनेटिक्‍स, प्रायव्हसीवरून अनेक मुद्दे असतील. देश सध्या एका मोठ्या बदलाच्या टोकावर आहे. सध्या शस्त्रास्त्रे नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही एक महान विश्वशक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. जोपर्यंत न्यायपालिका विकासाच्या आव्हानांशी सामना करू शकणार नाही, तोपर्यंत देशही प्रगती करू शकणार नाही, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.

न्यायमूर्ती ठाकूर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देशात न्यायाधीशांच्या अपुऱ्या संख्येवरून त्यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढलेले आहेत. न्यायाधीश बनणे सोपे नाही; पण एखादी व्यक्ती न्यायाधीश बनल्यास तेव्हा मात्र मोठ्या अडचणी येतात, असे एका खटल्यावेळी ते म्हणाले होते. एका कनिष्ठ न्यायाधीशांच्या अपिलावर सुनावणी करताना ते बोलत होते. कनिष्ठ न्यायाधीशाला त्यांचा राग आणि अनुचित व्यवहाराबद्दल पदावरून हटवण्यात आले होते. तुम्हाला अनेक प्रकारच्या वकिलांचा आणि याचिकाकर्त्यांचा सामना करावा लागतो. अशाप्रसंगी अनेकवेळा नाहक बाबी तुमच्या समोर येतात, त्या वेळी तुम्ही विनम्रता आणि धैर्य राखले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com