बंगालमधील डॉक्टरांचे बंड शमणार?

Mamata Banarjee
Mamata Banarjee

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्‍टरांनी आज सलग सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवल्याने राज्यातील वैद्यकीय सेवेचे बारा वाजले होते. संपकरी डॉक्‍टरांनी ममतांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली असून, ती चर्चा माध्यमांसमोर खुल्या पद्धतीने व्हायला हवी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तत्पूर्वी ममतांनी शनिवारी डॉक्‍टरांसमोर बंद दाराआड चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता; पण डॉक्‍टरांच्या संघटनांनी तो फेटाळून लावला होता. 

कनिष्ठ डॉक्‍टरांच्या 'जॉइंट फोरम'च्या बैठकीत सरकारशी चर्चेचा निर्णय घेण्यात आला. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. "आम्हीही चर्चेसाठी तयार आहोत, चर्चेचे ठिकाण ममतांनी ठरवावे, पण ती चर्चा खुली असावी. पत्रकारांसमोर ती होणे गरजेचे असून, बंद दाराआड ती होता कामा नये,'' असे डॉक्‍टरांच्या संघटनेने म्हटले आहे. सामान्य माणसाच्या हितासाठी आम्ही लवकरात लवकर कामावर रुजू होण्यासाठी तयार आहोत. आमच्या मागण्यांवर तार्किक चर्चेतून योग्य समाधान निघाले तर आमच्यासाठी चांगलेच आहे, असे डॉक्‍टरांच्या संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, याआधी शनिवारी राज्याच्या सचिवालयामध्ये झालेल्या बैठकीत ममतांनीही नरमाईची भूमिका घेत डॉक्‍टरांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. पण, डॉक्‍टरांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नव्हता.

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर तृणमूल कॉंग्रेसशी संबंधित काही नेत्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्‍टरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तृणमूल कॉंग्रेसचे मंत्री फिरहाद (बॉबी) हकीम यांच्या कन्या सब्बा हकीम, बारासातचे खासदार डॉ. काकोली घोष दस्तीदार यांच्या दोन चिरंजिवांनीही संपकरी डॉक्‍टरांना पाठिंबा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com