मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे कमल हसन यांनाही निमंत्रण

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मे 2019

मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष व अभिनेता कमल हसन यांनाही या शपथविधी सोहळ्यात सामील होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष व अभिनेता कमल हसन यांना 30 मे रोजी राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सामील होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, ते या सोहळ्यास उपस्थित राहतील का? याबद्दल मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. कमल हसन यांनी 2019च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते बराच काळ चर्चेत राहिले होते.

दरम्यान, तमिळनाडूमधील निवडणूक प्रचारादरम्यान हसन म्हणाले होते की, नथुराम गोडसे हा भारताचा पहिला हिंदू दहशतवादी होता, ज्याने महात्मा गांधींना ठार केले. हसन यांच्या या विधानाबद्दल सर्व हिंदू संघटना आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, टीका केल्यानंतरही कमल आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचेही कमल हसन यांनी त्यावेळी सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamal Haasan attend the Swearing Ceremony Of PM Narendra Modi