राम मंदिर ट्रस्टमधील एकमेव दलित सदस्य आहेत तरी कोण?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

अयोध्येतील रामजन्मभूमीबद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावल्यानंतर भाजपचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले होते की, राम मंदिर निर्मितीसाठी जो ट्रस्ट तयार करण्यात येईल, त्यामध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश असणार नाही. 

सुप्रीम कोर्टाने राम मंदिर ट्रस्टची स्थापना करण्याबाबत 9 फेब्रुवारीपर्यंतची मुदत जाहीर केली. त्यापूर्वीच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर उभारण्यासाठी एका स्वतंत्र ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा केली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत म्हटले की, राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टमध्ये 15 सदस्यांचा समावेश असेल. ज्यामध्ये एक सदस्य हा दलित समाजातील असेल. आणि बिहारमधील कामेश्वर चौपाल हे दलित सदस्य या ट्रस्टमध्ये असतील, अशी माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. 

Image may contain: 2 people, people sitting

कोण आहेत कामेश्वर चौपाल? 

कामेश्वर चौपाल हे बिहारमधील भाजपचे वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी 2014 मध्ये सुपौल लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. यापूर्वी चौपाल यांनी राम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यानंतर त्यांची बिहारचे विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 9 नोव्हेंबर 1989 मध्ये अयोध्येत राम मंदिर शिलान्यासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तेव्हा चौपाल प्रसिद्धीझोतात आले. देशाच्या विविध भागातील साधु-संत, कारसेवक हजारोंच्या संख्येत या शिलान्यास कार्यक्रमाला आले होते. आणि यावेळी चौपाल यांना पहिली शिळा ठेवण्याचा मान मिळाला होता. 

- लोकसभेत गोंधळ; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून, भाजप-काँग्रेस सदस्य भिडले

शिला रचण्याचा मान चौपाल यांनाचा का मिळाला?

शिलान्यास कार्यक्रमाच्या अगोदर झालेल्या कुंभमेळ्यात सर्व धर्मगुरू आणि साधु-संतांच्या झालेल्या बैठकीत असे ठरले होते की, दलित समाजातील व्यक्तीच्या हस्ते शिलान्यास कार्यक्रम करण्यात येईल. या कार्यक्रमास कारसेवक आणि विहिंपचा संगठनमंत्री म्हणून चौपाल उपस्थित होते. तेव्हा सर्व उपस्थित धर्मगुरूंनी चौपाल यांच्या नावास पाठिंबा दर्शविला. 

Image may contain: sky and outdoor

1984 ला विहिंपतर्फे दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात चौपाल सहभागी झाले होते. राम मंदिरासाठी जनजागृती अभियान सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी गोरक्षा पीठाचे तत्कालीन पीठाधीश्वर महंत के. अवैद्यनाथ यांची जनजागृती अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या अभियानास मिथिलांचल येथून सुरवात झाली. सीता ही रामासाठी शक्ती होती, त्यामुळे सीतेची जन्मभूमी असलेल्या जनकपूर येथून याची सुरवात व्हावी, अशी मागणी होत होती. 

राम जन्मभूमी संघर्ष समितीद्वारे देशभरात जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते होते. राम-जानकी यात्रेचा प्रभारी म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली होती. 1986 च्या फेब्रुवारी महिन्यात राम जन्मभूमी खुली करण्यात आली. खरंतर कोर्टाच्या आदेशानुसार ती खुली करण्यात आली असली तरी आमच्या राम-जानकी यात्रेचा प्रभावही खूप पडला होता, अशी माहिती चौपाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 

Image may contain: 1 person

राम जन्मभूमी आंदोलन म्हटलं की लालकृष्ण अडवानी यांच्या रथयात्रेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अडवाणी आणि विहिंपची रथयात्रा या वेगवेगळ्या होत्या. अडवाणींच्या रथयात्रेला तत्कालिन लालूप्रसाद यादव यांच्या बिहार सरकारने पटनामध्ये विरोध दर्शविला होता.  

- ...तर पाकिस्तानच्या नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू : भारत सरकार

अडवाणींची रथयात्रा शिलान्यास कार्यक्रमानंतर सुरू झाली होती. तर विहिंपने रथयात्रांची राळ उठविली होती. अडवाणी यांनी दिल्लीच्या पालम येथून या रथयात्रेला सुरवात करताना राम जन्मभूमीसाठी झटणाऱ्या अनेकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही यात्रा काढली जात असल्याचे स्पष्ट केले होते. उडिसामार्गे बिहारमध्ये दाखल झालेल्या या यात्रेदरम्यान विहिंपचा संघटनमंत्री म्हणून मी अडवाणी यांच्यासोबत समस्तीपूरपर्यंतचा प्रवास केल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. 

चौपाल यांच्याविषयी :

24 एप्रिल 1956 कामेश्वर चौपाल यांचा जन्म झाला. बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील कमरैल गावचे ते रहिवासी आहेत. हा भाग कोसीचा भाग म्हणूनही ओळखला जातो. मी लहान होतो तेव्हा आमचं घर हे भागलपूर जिल्ह्यामध्ये येत होते. त्यानंतर सहरसा आणि आता सुपौल जिल्ह्याचा भाग म्हणून ओळखला जात असता तरी आमचा भाग हा कोसीच्या तांडवामध्ये तडाखे खाणारा भाग म्हणूनही ओळखला जातो.

चौपाल यांनी जेएन कॉलेज मधुबनीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर 1985 साली मिथिला विश्वविद्यालय दरभंगामधून एमएचे शिक्षण पूर्ण केले आहे. चौपाल हे बिहारमधील अनुसूचित जातीमध्ये मोडतात. पान आणि खतवा अशा दोन उपजातीही त्यांच्यामध्ये असून त्यांची गणना गरीब आणि मागासवर्गीयांत केली जाते. 

खूप हालअपेष्टांमध्ये बालपण गेले. कोसीच्या पुरामुळे दरवर्षी आमची ताटातूट होत होती. वडील धार्मिक कार्यक्रमांमध्ये गुंग असायचे. घरामध्ये पहिल्यापासून वैष्णव धर्माची परंपरा असल्याने हाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत, असे चौपाल यांनी सांगितले. 

Image may contain: 27 people, including Manohar Sankpal, people standing

राम मंदिर आंदोलनाशी संबंध येण्याबद्दल चौपाल म्हणतात, जगासाठी श्रीराम हे देव असले तरी ते आमचे जावई आहेत, कारण आम्ही मिथिलाचे रहिवासी आहोत. आमची आई रोज सकाळी-संध्याकाळी आमच्या मातृभाषेत रामाची गाणी म्हणत असे. विद्यार्थीदशेत माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. आणि त्यानंतर हिंदुत्व आणि हिंदू संस्कृतीशी अनेक आंदोलनांमध्ये मी सहभागी होत गेलो. 

दरम्यान, राम मंदिर निर्माण करण्यासाठी जे ट्रस्ट स्थापन करण्यात येत आहे, त्याबद्दल अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. उत्तर प्रदेशमधील महंत परमहंसदास यांनी धरणे आंदोलन करत जे साधु मंदिर आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना ट्रस्टमध्ये स्थान दिले गेले पाहिजे, अशी मागणी केली आहे. 

- मनिष सिसोदियांच्या विशेष अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

ट्रस्टमधील निवडीविषयी चौपाल म्हणाले...

मागासवर्गीय सदस्यासाठी असणारे ट्रस्टचे सदस्यत्व मिळाल्यानंतर चौपाल म्हणाले, देशाची लोकसंख्या जवळपास दीडशे कोटींच्या आसपास आहे. यामध्ये हजारो जाती-जमाती आहेत. त्यामुळे जातीच्या आधारावर जर निवड करायची ठरले तर आणखी अवघड होईल. मला असे वाटते की, संत-परंपरा, हिंदू धर्म आणि हिंदुत्वाबद्दल ज्यांना मोठा अनुभव आहे, त्यांचीच निवड मोदी सरकारने केली आहे. 

ते पुढे म्हणाले की, आम्ही सर्वांना सोबत घेऊन विकास करू, असा भाजपचा संकल्प आहे. माझ्या निवडीचा अर्थ फक्त दलित समुदायाचा चेहरा म्हणून घेऊ नये. आम्ही रामजन्मभूमीचा शिलान्यास केला होता त्यामुळे राम मंदिरही आमच्या डोळ्यादेखत उभे राहावे, अशी इच्छा आहे. ट्रस्टमध्ये ज्यांची निवड झाली आहे ते सगळेजण चांगले सहकारी आहेत. 

Image may contain: 6 people, people standing

ट्रस्टमध्ये माझी निवड होण्यापूर्वी कुणीही माझ्याशी याबाबत संपर्क केला नव्हता. जेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी माझ्या नावाची घोषणा केली, तेव्हाच मला याबाबत समजले, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. चौपाल हे राजकारणाशी थेट संबंधित असल्याने त्यांच्या निवडीवर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. 

शिलान्यास कार्यक्रम पार पडल्यानंतर भाजपने चौपाल यांचा जाहीर प्रवेश करवून घेतला होता. त्यांची लोकप्रियता पाहून 1991 मध्ये रोसडा राखीव लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपच्या तिकीटावर उमेदवारी दिली होती, पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर 1995 मध्ये बेगूसरायच्या बखरी विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 2002 मध्ये ते बिहार विधान परिषदेचे सदस्य झाले. 2014 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. 

2009च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचा समावेश भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये करण्यात आला होता. त्यावेळी 'रोटी के साथ राम' हा नारा दिल्याने ते पुन्हा चर्चेत आले होते. पुन्हा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत चौपाल यांनी सुपौल या घरच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि त्यांचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. 

Image may contain: 1 person, glasses

भाजपचे दलित कार्ड 

चौपाल यांच्या रुपाने भाजपने दलित कार्ड बाहेर काढले आहे. चौपाल यांना राम मंदिर आंदोलनात सहभागी होऊन अनेक वर्षे काळ लोटला आहे. अनेकांना तर त्याचा विसरही पडला आहे. त्यामुळे राम जन्मभूमीच्या आंदोलनातील दलित चेहरा अशी चौपाल यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने याचा फायदा भाजप नक्कीच घेणार यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kameshwar Chaupal has became the only Dalit member of Ram Mandir Trust