कानपूर रेल्वे दुर्घटनेमागे 'आयएसआय'चा हात

file photo
file photo

बिहार पोलिसांच्या तपासात माहिती उघड

पाटणा- कानपूरजवळच्या पुखरावा येथे गेल्या वर्षीच्या वीस नोव्हेंबरला झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानच्या कुख्यात "इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' (आयएसआय) या गुप्तहेर संघटनेचा हात होता. बिहार पोलिसांसह या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपास संस्थांनी हा खुलासा केला आहे. पाटणा- इंदूर एक्‍स्प्रेसला झालेल्या अपघातात 152 जण ठार झाले होते.

पूर्व चंपारण्यचे पोलिस अधीक्षक जितेंद्र राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ आणि दुबईत असलेल्या "आयएसआय'च्या बड्या म्होरक्‍यांनी एजंटांची मदत घेऊन दहशतवादी कारवाई घडविण्याची योजना आखली होती. नेपाळ सीमेवर अटक करण्यात आलेल्या मोतीलाल पासवान याच्या कबुलीजबाबातून चक्रावणारी माहिती पोलिसांना मिळाली.

कानपूर रेल्वे दुर्घटनेमागे आपली महत्त्वाची भूमिका असल्याचे पासवानने कबूल केले आहे. त्याने सांगितले, की पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील घोडासहन येथे लोहमार्ग उद्‌ध्वस्त करण्यासाठी नेपाळच्या बृजकिशोर गिरी याला वीस लाख रुपये दिले गेले होते. दुबईतील शमशुल होदा याने या संदर्भातील योजना आखली होती. कानपूर रेल्वे दुर्घटनेनंतर आपण इंदूर, दिल्ली आणि नेपाळमार्गे घरी परतलो, असे मोतीलालने सांगितले.

शमशुल होदा आघाडीवर
या सगळ्या घटनाक्रमात दुबईत राहणारा शमशुल होदा आघाडीवर असल्याचे पोलिसांना तपासात आढळले. नेपाळमधील एजंटांमार्फत तो बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढतो. पैशांचे आमिष दाखवून त्यांना काम कारण्यास प्रवृत्त केले जाते. नेपाळच्या बृजकिशोर गिरीनेच मोतीलालसह अन्य तरुणांना घातपाती कारवायांमध्ये सहभागी करून घेतले होते, असे तपासात स्पष्ट झाले. मोतीलालसह उमाशंकर आणि मुकेश या तरुणांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती राणा यांनी दिली. रेल्वे दुर्घटनेमागे "आयएसआय'चा हात असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर संस्थांनाही देण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या तिघांना आता दिल्लीत नेऊन चौकशी केली जाणार असून, बृजकिशोर गिरीला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com