श्रीनिवासची हत्या ही 'वैयक्तिक कृती' : परराष्ट्र सचिव

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

अमेरिकेतील कान्सास येथे भारतीय अभियंत्यावर झालेल्या हत्येच्या घटनेकडे हल्लेखोराची "वैयक्तिक कृती' म्हणून पाहण्यात यावे, असे आज (शनिवार) परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील कान्सास येथे भारतीय अभियंत्यावर झालेल्या हत्येच्या घटनेकडे हल्लेखोराची "वैयक्तिक कृती' म्हणून पाहण्यात यावे, असे आज (शनिवार) परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

"माझ्या देशातून चालते व्हा' असे म्हणत कान्सास येथे अलिकडेच श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय अभियंता, युवकाची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या घटनेबाबत बोलताना जयशंकर म्हणाले, "आम्ही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी, कॅबिनेटशी (अमेरिकन) केलेल्या चर्चेतून ही घटना म्हणजे "वैयक्तिक कृती' असल्याचे आढळले आहे. अमेरिकन न्यायव्यवस्थेचे काम सुरू आहे. हल्लेखोरांना योग्य ती शिक्षा होईल. हे प्रकरण द्वेषकारक गुन्हा म्हणून गृहित धरले जाईल.'

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जयशंकर यांनी कान्सास येथील हल्ल्याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, "या घटनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना, नागरिकांना आम्ही भेटलो. या घटनेबद्दल सर्वांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यानंतर आम्ही या घटनेकडे  खरोखरच आपण 'वैयक्तिक कृती' म्हणून पाहावे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोचलो. अमेरिकन व्यवस्था आणि अमेरिकन समाज या घटनेच्या विरुद्ध आहे.'

Web Title: Kansas shooting should be treated as individual act: Foreign Secretary S Jaishankar