काँग्रेस खासदाराचे कोरोनामुळे निधन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

देशात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यात आता अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

कन्याकुमारी - देशात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यात आता अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तामिळनाडुतील काँग्रेस खासदार एच वसंतकुमार यांचे कोरोनामुळे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एच वसंतकुमार यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही तासांपूर्वी रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली होती. 

अपोलो रुग्णालयाचे संचालक डॉक्टर आर के वेंकटसलाम यांनी म्हटलं होतं की, आयसीयुमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोना आणि न्युमोनियाही झाला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अपोलो रुग्णालयाने दिली होती. एच वसंतकुमार हे तामिळनाडुत पहिल्यांदा खासदार झाले होते. तर आधी दोनवेळा आमदारही होते.

लोकसभा खासदार एच वसंतकुमार यांच्या निधनानंतर काँग्रेसनं शोक व्यक्त केला आहे. वसंतकुमार यांचे अचानक जाणे हा मोठा धक्का आहे. एक कट्टर काँग्रेस कार्यकर्ता, सच्चा नेता आणि आवडता खासदार गमावला. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असं ट्विट काँग्रेसच्यावतीने करण्यात आलं आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटरवरून एच वसंतकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून एच वसंतकुमार यांच्या निधनानंतर फोटो शेअर करत शोक संवेदना व्यक्त केल्या. मोदींनी ट्विटरवर म्हटलं की, लोकसभा खासदार एच वसंतकुमार यांच्या निधनामुळे दु:ख झाले.

मोदींनी म्हटलं की,व्यापार आणि सामाजिक सेवा क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि प्रगती उल्लेखनीय होती. त्यांच्यातील तामिळनाडुच्या विकासासाठी त्यांचे काम आणि त्यासाठीचा उत्साह भेटीवेळी पाहिला होता. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanyakumari congress mp h vasanthakumar passes away