मिश्रांचा "आप'वर आणखी एक आरोप

यूएनआय
सोमवार, 22 मे 2017

केजरीवाल त्यांच्या पाच नेत्यांच्या परदेश दौऱ्यावर मौन बाळगून शीतल सिंह यांचा बचाव करत आहेत आणि माझ्यावर भाजपचा एजंट असल्याचा आरोप होत आहे

नवी दिल्ली - आम आदमी पक्षातून (आप) हकालपट्टी करण्यात आलेले दिल्लीतील माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि "आप'वर आरोपांचा भडिमार सुरूच ठेवला आहे. दिल्लीतील एका गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपीने "आप'नेते संजय सिंह आणि प्रवक्ते आशुतोष यांना रशिया दौरा घडवून आणल्याचा आरोप मिश्रांनी केला आहे.

दिल्लीत वर्षभरापूर्वी नंबर प्लेट गैरव्यवहार समोर आला होता. या गैरव्यवहारात समावेश असल्याचा संशय असलेल्या शीतल सिंह याने संजय सिंह आणि आशुतोष यांच्या रशिया दौऱ्यासाठी खर्च केल्याचा आरोप कपिल मिश्रांनी पत्रकार परिषदेत केला. शीतल सिंह हा उच्च सुरक्षा असलेल्या नंबर प्लेटच्या व्यवसायात सक्रिय असून, यामध्ये 400 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे.
नंबर प्लेट गैरव्यवहारातील कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस आम्ही केली होती. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आमच्याच समितीने केली होती, असे मिश्रांनी सांगितले. असे नेमके काय झाले की या कंपनीचे कंत्राट रद्द झाले नाही, याउलट कंपनीतील भागीदार शीतल सिंह हे "आप' नेत्यांसह रशियाला गेले, असा मुद्दा कपिल मिश्रांनी उपस्थित केला. केजरीवाल त्यांच्या पाच नेत्यांच्या परदेश दौऱ्यावर मौन बाळगून शीतल सिंह यांचा बचाव करत आहेत आणि माझ्यावर भाजपचा एजंट असल्याचा आरोप होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भूषण, योगेंद्र यांची मागितली माफी
"आप'मधील माजी नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी पक्षात हुकूमशाही वाढत असल्याविषयी सांगितले होते. मात्र, त्यांचे म्हणणे न ऐकून मी मोठी चूक केली, असे कपिल मिश्रा यांनी नमूद केले. भूषण आणि योगेंद्र यादव यांची माफी मागताना मिश्रा म्हणाले, की त्यांचे बोलणे गांभीर्याने न घेतल्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. या दोघांनी माझ्यासोबत यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Kapil Mishra criticizes AAP