'आप'चा गोंधळ; कपिल मिश्रांची हकालपट्टी शक्‍य

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 मे 2017

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा जाहीर आरोप करणारे त्यांचेच माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज भ्रष्टाचारविरोधी विभागात (एसीबी) जाऊन पुरावे दिले. त्यानंतर कपिल मिश्रा यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा जाहीर आरोप करणारे त्यांचेच माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज भ्रष्टाचारविरोधी विभागात (एसीबी) जाऊन पुरावे दिले. त्यानंतर कपिल मिश्रा यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले.

सोमवारी संध्याकाळी झालेल्या शिस्तपालन समितीच्या (पीएसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मिश्रा यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांचे मंत्रीपद यापूर्वीच काढून घेण्यात आले आहे. दरम्यान, मिश्रा यांनी आज लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात धाव घेत टॅंकर गैरव्यवहारप्रकरणी पुरावे सादर केले. उद्या (ता.9) ते सीबीआयकडे जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या सर्व गदारोळात केजरीवाल यांनी गेल्या सुमारे 30 तासांत आरोपांबाबत एक शब्दही उच्चारला नसला तरी, आपल्याविरुद्ध फार मोठे कारस्थान सुरू असल्याबाबतचे एक ट्विट त्यांनी सूचकपणे री-ट्विट केले आहे. मात्र, या प्रकरणात त्यांची विश्‍वासार्हता पूर्णपणे पणाला लागल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भाजप या साऱ्या खेळात सध्या तरी दर्शकाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवाल यांचा राजीनामा मागितला व काँग्रेसनेही हीच मागणी केली आहे. आपने आज केजरीवाल यांची भक्कम पाठराखण करताना, सामान्य दिल्लीकरांच्या मनात, 'केजरीवाल भ्रष्ट असूच शकत नाहीत,' हा ठाम विश्‍वास असल्याचे म्हटले. मिश्रा हे भाजपचीच भाषा बोलत आहेत, असेही पक्षाने म्हटले. 

केजरीवाल यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, दिल्ली सरकारला कामच करू द्यायचे नाही, असा निश्‍चय केलेल्या काही 'शक्तिशाली' शक्तींनी केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील पराभवाचे सूडचक्र फिरविले आहे. मिश्रा हे का सांगत नाहीत की ते शुक्रवारी कोणत्या वेळी मुख्यमंत्री निवासस्थानी गेले होते? त्यांना केजरीवालांनी बोलावून घेतले होते का? मिश्रा यांचे मंत्रिपद गेल्याने ते चवताळून मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. संजय सिंह यांनी मिश्रा यांनीच 'एसीबी'ला मागील वर्षी लिहिलेल्या पत्रात टॅंकर गैरव्यवहारातील चौकशी समाधानकारक नसल्याचे म्हटले होते. मग आता त्यांचा 'एसीबी'वर विश्‍वास कसा बसला?

दरम्यान, केजरीवाल यांच्यावर आरोप करणे मिश्रा यांना महागात जाणार असल्याची चिन्हे आहेत. ते ज्यांच्यावर भरवसा ठेवतात, त्या गटाचे नेते कुमार विश्‍वास यांनी या लाचप्रकरणी केजरीवालांची बाजू उचलून धरली आहे. आता मिश्रा यांनाही योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्याच मार्गाने जावे लागणार हेही स्पष्ट आहे. 

वद्रांचा टोला 
काँग्रेसच्या पहिल्या घराण्याचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी, केजरीवाल यांना 'करावे तसे भरावे', असा टोला लगावला आहे. वद्रा यांनी आज एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, 2010 मध्ये माझ्यावर बेफाम आरोप करणारे केजरीवाल आज तशाच आरोपांचे लक्ष्य झाले आहेत. विशेष म्हणजे हे आरोप त्यांच्याच सहकाऱ्याने केले आहेत. त्यांनी लाच घेतली की नाही, हे यथावकाश सिद्ध होईलच; पण यानिमित्ताने स्वच्छ राजकारणाचा मुखवटा फाटला, हेही जनतेला दिसेल.

Web Title: Kapil Mishra likely to be removed from AAP