केजरीवाल, तुमच्याविरुद्ध FIR करत आहे. आशीर्वाद द्या : कपिल मिश्रा

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

'दिल्लीतील कोणत्याही मतदारसंघातून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. तुमच्या आवडीचा मतदारसंघ निवडा. तुमच्याकडे पैसे, बळ आणि संपूर्ण टीम आहे. मी एकटा. या, आपण निवडणूक लढवू. आहे का हिंमत जनतेचा सामना करण्याची?', असे म्हणत मिश्रा यांनी आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक खुले पत्र लिहिले असून त्यामध्ये तुमच्याविरुद्ध FIR करत असल्याचे सांगत "माझ्या जीवनातील सर्वात मोठे युद्ध लढण्यापूर्वी आपले आशीर्वाद मागण्यासाठी हे पत्र लिहित आहे', असे म्हटले आहे.

मिश्रा यांनी एक खुले पत्र ट्विटरद्वारे प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, 'आदरणीय केजरीवाल जी, हे पत्र लिहिताना माझ्या मनात सर्व आठवणी जाग्या होत आहेत. आज तुमच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात जात आहे. भ्रष्टाचाराविरूद्ध लढणे आणि सत्यासाठी अडून बसणे हे मी तुमच्याकडूनच शिकलो. ज्या गुरूकडून धनुष्य बाण चालवायला शिकलो, त्याच गुरूवर बाण मारताना मन कठोर होत आहे. मात्र आता शांत राहणे अशक्‍य आहे. ज्या अरविंद केजरीवालांना पाहून हे सारे शिकलो; आज त्याच अरविंद केजरीवालांविरूद्ध जीवनातील सर्वांत मोठे युद्ध लढण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी हे पत्र लिहित आहे. कृपया मला आशीर्वाद द्यावा. अरविंदजी, सत्येंद्र जैनसोबत तुमचा काय संबंध आहे हे तुमच्या मनाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की मी कोणत्या प्रकारच्या पैशांच्या व्यवहाराबाबत बोलत आहे. मला माहिती आहे की जर त्यादिवशी मी एसीबीला पत्र दिले नसते तर तुम्ही मला तातडीने पदावरून हटविले नसते. ही गोष्ट मला तुमच्या काही सहकाऱ्यांनी सांगितली. आज सारे जण शांत आहेत. केवळ माझा देव माझ्यासोबत आहे. तुमच्या छळाचा, कटाचा, खोटेपणाचा आणि भ्रष्टाचाराचा चक्रव्यूह आज मी तोडायला निघालो आहे.'

असे म्हणत मिश्रा यांनी केजरीवाल यांना पुन्हा निवडणूक लढण्याचे आव्हानही दिले आहे. "दिल्लीतील कोणत्याही मतदारसंघातून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. तुमच्या आवडीचा मतदारसंघ निवडा. तुमच्याकडे पैसे, बळ आणि संपूर्ण टीम आहे. मी एकटा. या, आपण निवडणूक लढवू. आहे का हिंमत जनतेचा सामना करण्याची?', असे म्हणत मिश्रा यांनी आव्हान दिले आहे.

Web Title: Kapil Mishra open letter to Arvind Kejriwal