कपिल शर्माला मुभा, मग गायकवाडांवर बंदी का? : शिवसेना

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर चार हवाई वाहतूक कंपन्यांनी बंदी घालणे हे अतार्किक आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्ते मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारणारे शिवसेनचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातल्याबद्दल आनंदराव अडसूळ यांनी एअर इंडियाविरुद्ध लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, अशाच प्रकारानंतर कपिल शर्माला प्रवास करण्याची मुभा आहे, मात्र केवळ खासदार गायकवाड यांच्यावरच बंदी का, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. 

एअर इंडियाने खासदारावर गुन्हा दाखल केला आहे. सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घालणे चुकीचे आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाऱ्यांनुसार देशात कुठेही प्रवास करता येतो. अशाप्रकारे बंदी घालणे म्हणजे या हक्क हिरावून घेण्यासारखे आहे. या प्रकरणी सर्व खासदार सहकार्य करतील अशी अपेक्षा अडसूळ यांनी व्यक्त केली. तसेच, शिआनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव आढळराव पाटील या शिवसेनेच्या सहा खासदारांचे शिष्टमंडळ लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या दालनात हजर झाले. अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासोबत शिवसेनेची बैठक सुरू झाली. मंत्री गजपती राजू यांनाही बैठकीला बोलावण्यात आले.

लोकसभा अध्यक्षांनी याबाबत सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती त्यांनी यावेळी केली. अभिनेता कपिल शर्मा याने मारहाण केली, परंतु त्यावर अशी कारवाई झाली नाही. नागरी विमान वाहतूक मंत्री यांनी याची दखल घ्यावी. गायकवाड यांच्यावर घातलेली बंदी विमान कंपन्यांनी उठवावी, अशी मागणी आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत केली. 

त्यावर लोकसभेत उत्तर देताना अशोक गजपती राजू म्हणाले, 'कोणत्याही प्रवाशाला बंदी घालता येत नाही. खासदार हे सुद्धा प्रवासी आहेत. आम्ही खासदार म्हणून भेदभाव करू शकत नाही. सेफ्टी संदर्भात काँप्रमाईज करता येणार नाही.'
दरम्यान, रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर चार हवाई वाहतूक कंपन्यांनी बंदी घालणे हे अतार्किक आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्ते मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. 
 

शिवसेनेने गायकवाड यांची पाठराखण केली असली तरी आता यावर कोणतेही भाष्य न करता मौन बाळगावे अशा सूचना पक्षातर्फे गायकवाड यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गायकवाड सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत गुढी पाडवा साजरा करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पाडव्यानंतर गायकवाड लोकसभेत बुधवारी उपस्थिती लावणार आहेत. त्यावेळी त्यांच्यावर संसदेकडून काही कारवाई होणार का किंवा त्यांच्यावरील विमान प्रवास बंदी उठविण्यात येणार का हे स्पष्ट होईल. 

Web Title: kapil sharma let go, then why ban on mp gaikwad, asks shiv sena