लढत संपली निकालाकडे लक्ष 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 मे 2018

बंगळूर : दक्षिणेचे महाद्वार असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी पाचच्या सुमारास संपला. आज शेवटच्या दिवशीही कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले, तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष 130 जागांवर विजयी होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. कर्नाटक विधानसभेसाठी बारा मे रोजी मतदान होणार असून, पंधरा मे रोजी जनतेचा कौल स्पष्ट होईल. 

बंगळूर : दक्षिणेचे महाद्वार असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी पाचच्या सुमारास संपला. आज शेवटच्या दिवशीही कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले, तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष 130 जागांवर विजयी होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. कर्नाटक विधानसभेसाठी बारा मे रोजी मतदान होणार असून, पंधरा मे रोजी जनतेचा कौल स्पष्ट होईल. 

माझ्या आईचा त्याग मोठा : राहुल 
"यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राष्ट्रीयत्वावर वारंवार प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजपवर आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कडाडून टीका केली. माझ्या आईचा जन्म हा इटलीमधील असला तरीसुद्धा तिने भारतासाठी मोठा त्याग केला आहे. अनेक भारतीयांपेक्षा त्या अधिक भारतीय आहेत, असे राहुल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केले. माझ्या आईने या देशासाठी बलिदान करताना मोठा त्रास सहन केला आहे, मोदी जेव्हा अशा प्रकारची वक्तव्ये करतात तेव्हा त्यातून त्यांची लायकी दिसून येते. मोदींना अशी विधाने करण्यात आनंद होत असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीसाठीचा अंतिम टप्प्यातील प्रचार संपुष्टात आल्यानंतर राहुल यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. 

राहुल म्हणाले... 
ही निवडणूक कर्नाटकसाठी आहे. 
दलितांबाबत पंतप्रधान मोदींचे मौन. 
चीन दौऱ्यात डोकलामवर मोदी गप्पच. 
भ्रष्ट नेत्यांनाच भाजपकडून उमेदवारी. 
भाजपला हिंदुत्व समजत नाही. 

कॉंग्रेसमध्ये दलितांना स्थानच नाही : मोदी 
 

कॉंग्रेसच्या हृदयामध्ये दलित आणि मागासवर्गीयांना कोणतेही स्थान नाही, आमचे सरकार डॉ. आंबेडकरांचे शक्तिशाली आणि समृद्ध भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कॉंग्रेसने कधीही डॉ. आंबेडकरांना सन्मान दिला नाही. डॉ. आंबेडकर यांना 1952 साली लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसनेच पराभूत केले होते. तसेच 1953 साली भंडारा पोटनिवडणुकीमध्येही याची पुनरावृत्ती झाली, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. मोदी यांनी आज "नमो ऍप'च्या माध्यमातून भाजपच्या एस/एसटी/ओबीसी आणि झोडपट्टी मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ""डॉ. आंबेडकरांचा सन्मान केल्याचा एक तरी पुरावा कॉंग्रेसने दाखवून द्यावा. कॉंग्रेस पक्ष सत्तेत होता तोवर डॉ. आंबेडकरांना भारतरत्न हा किताब मिळाला नाही. आज विविध योजनांच्या माध्यमातून सरकार सामाजिक न्याय आणि समानतेसाठी काम करत आहे.'' 

मोदी म्हणाले... 
भाजपमध्ये सर्वाधिक दलित खासदार. 
वाजपेयींनी मागासवर्गीयांसाठी मंत्रालय बनविले. 
मागासवर्गीयांचा भाजपलाच पाठिंबा. 
भाजपच्या जाहीरनाम्यात दलितांना स्थान. 
ओबीसी आयोगाला आम्ही घटनात्मक केले. 

Web Title: karnatak election - watch on result