'बजरंगबली की जय'च्या घोषणेनं मोदींची भाषणाला सुरुवात; म्हणाले, 'यांच्या'पासून सावध राहा I Karnataka Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Congress

काँग्रेसला काय करायचे आहे? त्यांना कर्नाटकला दिल्लीतील राजघराण्याचे एटीएम बनवायचे आहे.

Karnataka Election : 'बजरंगबली की जय'च्या घोषणेनं मोदींची भाषणाला सुरुवात; म्हणाले, 'यांच्या'पासून सावध राहा

बंगळूर : काँग्रेस (Congress) शांतता आणि विकासाचा शत्रू असून ते तुष्टीकरणाचे धोरण अवलंबत आहेत. तुष्टीकरण हीच काँग्रेसची ओळख आहे. ज्या राज्यांना विकास हवा आहे, ते काँग्रेसला आपल्या राज्यातून हद्दपार करत आहेत. काँग्रेस सैनिक आणि संरक्षण दलाचा अपमान करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली.

बुधवारी मुल्की येथील कोलनाड येथे निवडणूक (Karnataka Assembly Election) प्रचारादरम्यान त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. बजरंग दल बंदीच्या प्रस्तावानेही पंतप्रधानांच्या कार्यक्रमात प्रसिद्धी मिळवली. ‘बजरंगबली की जय’ या घोषणेने मोदींनी मुल्की येथे भाषणाची सुरुवात केली.

मोदी म्हणाले, ‘‘मंगळूर आणि उडुपी जिल्हे शिक्षणात टॉपर्ससाठी ओळखले जातात. कृषी, शिक्षण, मत्स्यव्यवसाय, बंदरे यासह सर्वच क्षेत्रांच्या विकासात कर्नाटकला नंबर वन बनवायचे आहे. पण काँग्रेसला काय करायचे आहे? त्यांना कर्नाटकला दिल्लीतील राजघराण्याचे एटीएम बनवायचे आहे. प्रत्येक योजनेत ८५ टक्के कमिशन खाणारी काँग्रेस कर्नाटकचा विकास रिव्हर्स गियरमध्ये घेणार आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनतेने काँग्रेस आणि धजद यांच्यापासून सावध राहावे. भाजपचा संकल्प कर्नाटकला प्रथम क्रमांकावर आणणे आणि आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करणे, राज्य उत्पादन महासत्ता बनवणे आहे.’’

आम्ही मच्छिमार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहोत. २०१४ पर्यंत देशांतर्गत मत्स्यपालन उत्पादन ६० लाख टन होते. गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारकाळात उत्पादन १२० लाख टनांपेक्षा जास्त वाढले आहे. अवकाश क्षेत्राचे दरवाजे खासगी कंपन्यांसाठी खुले झाले आहेत. कर्नाटकातील तरुण रॉकेट आणि सॅटेलाइट बनवत आहेत. एचएएलने सर्वाधिक नफा नोंदवला आहे. देशात नवनिर्मितीची लाट निर्माण होईल. भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. आम्ही इंग्लंडला मागे टाकून पाचव्या स्थानावर पोहोचलो आहोत.