गौरी लंकेशच्या मारेकऱ्याला झारखंडमध्ये अटक; आरोपी मूळचा औरंगाबादचा

उज्ज्वल कुमार : सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 10 January 2020

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचे गूढ कायम असताना गौरी लंकेश यांच्या हत्येनेही तपास यंत्रणांपुढे आव्हान निर्माण केले होते.

रांची : बेंगळुरूमध्ये (Bengaluru) पत्रकार गौरी लंकेश (Gouri Lankesh) यांचा खून करणाऱ्याला पोलिसांनी झारखंडमध्ये धनबाद येथे पकडले आहे. कर्नाटक पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. संबंधित आरोपी महाराष्ट्रातील औरंगाबादचा असल्याची माहिती मिळाली असून, ऋषिकेश देवरीकर (वय 41) असे त्याचे नाव आहे. ऋषिकेश वेगवेगळ्या नावांनी राहत असल्याची माहिती मिळाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 1 person, hat and close-up

ऋषिकेश देवरीकरवर

कोण आहे ऋषिकेश देवरीकर?
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचे गूढ कायम असताना गौरी लंकेश यांच्या हत्येनेही तपास यंत्रणांपुढे आव्हान निर्माण केले होते. पण, या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणा निष्कर्षापर्यंत पोहोचत असल्याचे दिसत होते. मुळचा औरंगाबादचा रहिवासी असलेल्या ऋषिकेश देवरीकरवर तपास यंत्रणांची पळत होती. तो झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यात नाव बदलून राहत होता. मुरली, शिवा, राजेश, भास्कर अशी त्यानं नावं बदलल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळाली आहे. झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात कतरास शहरात तो भगत मोहल्ला परिसरात राहत होता.  

आणखी वाचा - असा अडकला इजाज लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कधी झाली होती हत्या?
बेंगळुरू स्थित सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. बेंगळुरूतील राजराजेश्वरी नगरमध्ये गौरी लंकेश यांच्या घरीच रात्री आठच्या सुमारास ही घटना होती. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. गौरी लंकेश कामावरून परतल्यानंतर घराच्या दारातच हा प्रकार घडला होता. संशयित मारेकऱ्यांपैकी एक जण घराजवळ त्यांची वाट पाहत होता. त्यानेच गौरी लंकेश यांच्यावर पहिल्यांदा गोळ्या झाडल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तर, इतर दोघा संशयितांनी त्यांचा ऑफिसपासून घरापर्यंत पाठलाग केला होता. त्यांनीही नंतर गौरी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. संशयितांनी हेल्मेट घातले होते. त्यामुळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची ओळख पटण्यात अडचणी आल्या होत्या. गौरी यांना डोक्यात, गळ्यात आणि छातीत गोळी लागली होती. त्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karnataka ats arrests one person in case of gauri lankesh murder