त्यांना रेल्वे रुळावरच लागली गाढ झोप अन् मग काय... (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

कर्नाटकात घडलेल्या घटनेचा हा व्हायरल व्हिडिओ सध्या बेळगाव जिल्ह्यात व्हायरल झाला आहे. बोलण्याच्या भाषेवरून हा व्हिडिओ कर्नाटकातीलच असल्याचे निश्चित आहे.सोशल मिडियावर हा व्हिडिओ गोकाक स्टेशन परिसरातील असल्याचा दावा केला जात आहे. पण हा व्हिडिओ पाहून आपण असे कृत्य करण्याचा प्रयत्न करू नये. कारण अशा घटनेत जीव जाण्याचाही धोका आहे...

बेळगाव - एका वयस्कर व्यक्तीला झोप आली आणि ते चक्क रेल्वेच्या पटरीवर झोपी गेले. काही वेळातच त्यांना गाढ झोप लागली. थोड्यावेळाने या मार्गावर मालगाडी आली. ही मालगाडी त्यांच्या अंगावरून गेली पण ते दोन रुळांच्यामध्ये झोपलेले असल्याने ते सुरक्षित होते. मालगाडीच्या आवाजाने त्यांना जाग आली. त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. ही घटना काहीजण पाहात होते. गाढ झोपेत असलेल्या या गृहस्थांस नेमक काय होते आहे याचेही भान नव्हते. त्याला भानावर आणण्यासाठी तेथे असणाऱ्या जनसमुदायाने आरडाओरडा केला. कन्नड भाषेत त्यांना उठू नका असे ते सांगू लागले. मालगाडी चालकासही गाडी थांबविण्यास त्यांनी सुचना केली. अखेर मालगाडी थांबली. मालगाडी थांबल्यानंतर हे गृहस्थ सुखरूपपणे बाहेर पडले. ही घटना कर्नाटकातील आहे.  बेळगाव जिल्ह्यात हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

रेल्वे मार्गावर अशा घटना क्वचितच घडतात. वेगात असणारी गाडी तातडीने थांबवणे शक्य नसते. त्यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. यासाठी रेल्वे रूळावर असे प्रयोग करणे टाळावे. जीव हा माैल्यवान आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते होऊ शकते. हा व्हिडिओ पाहून असा प्रयोग करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Belgaum District Viral Video story