
Karnataka Cabinet Expansion: कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारचा आज विस्तार; 24 मंत्री घेणार शपथ
ज्येष्ठ नेते सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार मंत्रिमंडळाचा आज दुपारी विस्तार होणार असून सांयकाळपर्यंत खात्यांचे वाटप होणार आहे. चार-पाच मंत्रीपदे वगळता उर्वरित पदे एकाच दिवसात भरली जातील, असे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी शुक्रवारी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन मंत्री सकाळी ११.४५ वाजता शपथ घेतील. दिल्लीहून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुनियप्पा म्हणाले की, मंत्रिमंडळ म्हणजे ज्येष्ठ आणि तरुण सदस्यांचे मिश्रण आहे. कोणते खाते कोणाला द्यायचे, याचा निर्णय होणार आहे. खातेवाटप शनिवारी सायंकाळपर्यंत जाहीर होईल.
माजी केंद्रीय मंत्री आणि सात वेळा लोकसभेचे सदस्य असलेले देवनहळ्ळीचे आमदार मुनियप्पा यांनी २० मे रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमवेत मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. कर्नाटकात सर्वाधिक ३४ मंत्रीपदे देता येतात. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह आतापर्यंत १० जणांना मंत्रिपदे दिली आहेत. आणखी २४ मंत्रीपदे रिक्त आहेत.
सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी सातत्याने बैठका घेतल्यानंतर नव्या मंत्र्यांची यादी निश्चित केली आहे. हायकमांड संध्याकाळपर्यंत नव्या मंत्र्यांची यादी जाहीर करणार असल्याचे समजते. पूर्ण मंत्रिमंडळ स्थापन करण्यावर वरिष्ठांनी सहमती दर्शवली. यापूर्वी केवळ २० पदे भरण्याचा आणि चार पदे रिक्त ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र अखेरच्या क्षणी मंत्रीपदासाठी वाढलेली स्पर्धा पाहता उर्वरित सर्व २४ पदे भरण्याचा निर्णय हायकमांडने घेतल्याचे समजते.
सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री व डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून 20 मे रोजी शपथ घेतली होती. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांच्यासह 8 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
ज्येष्ठ आमदार एच.के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चैलुलरायस्वामी, के वेंकटेश, एच.सी. महादेवप्पा, काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खंडे, माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडु राव , शिवानंद पाटील, रहीम खान, मंकल वैद्य, डी. सुधाकर, संतोष एस लाड, एन.एस. बोस राजू, सुरेश बी.एस, मधु बंगारप्पा आदी आज मंत्रीपदासाठी शपथ घेणार आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी काल (शुक्रवारी) सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मंत्रीपदाच्या नावावर अंतिम निर्णय झाला.