कर्नाटकमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

बहुमत चाचणीपूर्वी भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता काँग्रेसच्या पाठिंब्यावर जेडीएस नेते कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा उद्या (बुधवार) होणार आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार स्थापन होत आहे. जेडीएसकडे काँग्रेसपेक्षा कमी आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला 20 तर जेडीएसला 13 मंत्रिपदे मिळणार आहेत. मात्र, काँग्रेसमधील उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटला नाही. 

बहुमत चाचणीपूर्वी भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता काँग्रेसच्या पाठिंब्यावर जेडीएस नेते कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा उद्या (बुधवार) होणार आहे. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसला 20 मंत्रिपदे देण्यात येणार असून, जेडीएसला 13 मंत्रिपदे मिळणार आहेत. काँग्रेस नेते जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. 78 आमदार असलेल्या काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार आहे. 

दरम्यान, आमच्याकडे दोन उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली जात आहे. मात्र, पक्षश्रेष्ठीच यावर निर्णय घेतील, असे परमेश्वर यांनी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, वेणूगोपाल आणि अशोक गहलोत यांच्याशी भेट घेतल्यानंतर सांगितले. तसेच कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला अध्यक्षपद मिळणार असून, त्या नावाची घोषणा आज (मंगळवार) होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Karnataka Cabinet Ministry Allocations with 20 and 13 seats