Karnataka CM: दोघांच्या भांडणात तिसराच मुख्यमंत्री? काँग्रेस नेता म्हणतो ५० आमदार माझ्या पाठीशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka CM

Karnataka CM: दोघांच्या भांडणात तिसराच मुख्यमंत्री? काँग्रेस नेता म्हणतो ५० आमदार माझ्या पाठीशी

कर्नाटकात काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसला बहुमत मिळालं. त्यानंतर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यापैकी कुणाला मुख्यमंत्रिपद द्यायचं यावरून पक्षात चर्चा सुरू आहेत. कुणाच्या हातात राज्याची सत्ता द्यावी यासाठी काँग्रेसमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत.

अशातच आता आणखी दोन नेत्यांनीही मुख्यमंत्रीपदाचा दावा केला आहे. एका आमदाराने तर चक्क माझ्याकडे 50 आमदारांचं बळ असल्याचं सांगून अप्रत्यक्षपणे हायकमांडला इशाराच दिला आहे. इतकेच नव्हे तर या आमदाराने यापूर्वी उपमुख्यमंत्रीपदही भूषविलेलं आहे. त्यामुळे दोन नेत्यांचं टेन्शन असताना आता त्यात आणखी दोघांची भर पडल्याने हायकमांडच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार डीके शिवकुमार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे. एक तर मला मुख्यमंत्री करा. नाही तर मी आमदार म्हणूनच राहीन. मला उपमुख्यमंत्री करायची गरज नाही. मंत्रीही बनण्याची इच्छा नाही, असं शिवकुमार यांनी खर्गे यांना सांगितल्याचं समजतं.

मुख्यमंत्रीपदाचा पेच असतानाच आता पक्षातील अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदावरही दावा सांगितला आहे. त्यामुळे डोकेदुखी आणखी वाढली आहे. कर्नाटकमधील दलित नेते जी परमेश्वर यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. परमेश्वर हे कर्नाटकात उपमुख्यमंत्री होते. तसेच ते पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्षही राहिले होते.

2013मध्ये काँग्रेसचं सरकार आलं होतं. तेव्हाही ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, सिद्धारमय्य यांच्या ते मागे पडले. आता मात्र, त्यांनी पुन्हा एकदा आपला दावा सांगितला आहे. मी शांत आहे, याचा अर्थ मी रेसमध्ये नाही असं होत नाही. मनात आणलं तर मी हंगामा करू शकतो. माझ्यासोबत 50 आमदार आहेत. मात्र, पदासाठी पुढे पुढे करणं योग्य नाही, असं परमेश्वर यांनी म्हंटलं आहे.

जी परमेश्वर यांच्यासोबतच बेळगावी उत्तरचे आमदार आसिफ सैत यांनी सतीश जारकीहोली यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचवलं आहे. ते जारकीहोली राज्य काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षही होते. जारकीहोली उत्तर कर्नाटकातील नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे. तर वरिष्ठ नेते जमीर अहमद खान यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे, असं सैत म्हणाले. मी हायकमांडला पत्र लिहिलं आहे. जर पत्राचं उत्तर मिळालं नाही तर पक्षातील एका गटाच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशाराही सैत यांनी दिला आहे.

सत्ता मिळूनही काँग्रेससमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. 2 जणांच्या नावांमध्ये आता आणखी दोन नावे चर्चेत आल्यामुळे काँग्रेसच्या हायकमांड आणि जेष्ठ नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

टॅग्स :CongressKarnatakaCM oath