सिद्धरामय्या की DK? मुख्यमंत्रीपदाचा तिढा आज सुटणार, हायकमांडच्या घोषणेकडं लक्ष्य I Karnataka CM | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Election Result 2023

सिद्धरामय्या हे राज्यव्यापी लोकप्रिय म्हणून प्रसिद्ध आहेत. काँग्रेस आमदारांच्या मोठ्या वर्गामध्ये लोकप्रियता आहे.

Karnataka CM : सिद्धरामय्या की DK? मुख्यमंत्रीपदाचा तिढा आज सुटणार, हायकमांडच्या घोषणेकडं लक्ष्य

बंगळूर : राज्यातील १६ व्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं (Congress) १३५ जागा जिंकल्यानंतर आता पुढील मुख्यमंत्री कोण याकडं संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेसच्या छावणीत, हायकमांड आणि सामान्य जनतेला हा एकच प्रश्न विचारला जात आहे.

राज्याची धुरा सांभाळण्यासाठी सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांच्यात मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. यापूर्वी अनेकदा दोन्ही नेत्यांनी राज्याचं नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा उघडपणे व्यक्त केली होती. रविवारी रात्री बंगळूर इथं झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीत आमदारांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एम. मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्याचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी एकमतानं ठराव केला.

सिद्धरामय्या हे राज्यव्यापी लोकप्रिय म्हणून प्रसिद्ध आहेत. काँग्रेस आमदारांच्या मोठ्या वर्गामध्ये लोकप्रियता आहे. मुख्यमंत्री म्हणून पूर्णवेळ सरकार चालवण्याचा अनुभव आहे. राज्यात १३ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा अनुभव असलेले सिद्धरामय्या हे एक कार्यक्षम प्रशासक आहेत. 'अहिंद' (अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित) ही घोषणा त्यांनीच आणली.

भाजप आणि धजदचा प्रभावीपणे मुकाबला करण्याची शक्ती त्यांच्याकडं आहे. राहुल गांधी यांचे जवळचे मित्र म्हणून ते ओळखले जातात. पण, पक्षाशी संघटनात्मक संबंध नाही. २०१८ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यात अपयश आलं. सिद्धरामय्या यांना अजूनही मूळ काँग्रेसवाले बाहेरचे समजतात. सिद्धरामय्या हे यापूर्वी जनता दलामध्ये होते. पण, ते सध्या ७५ वर्षांचे आहेत. सिद्धरामय्या यांची ही शेवटची निवडणूक आणि मुख्यमंत्री होण्याची शेवटची संधी आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला बळकट करू शकतात, हा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे.

'संकटमोचक' शिवकुमार

शिवकुमार यांची संघटन शक्ती चांगली आहे. पक्षाचे 'संकटमोचक' ही पदवी त्यांना मिळाली आहे. गांधी कुटुंबाशी निष्ठावंत म्हणून ओळख आहे. विशेषत: सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वाद्रा यांच्याशी थेट संबंध आहेत. मजबूत संघटनात्मक कौशल्य आणि निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला. कठीण काळात काँग्रेसचं समस्यानिवारण केलं. मजबूत वाक्कलिंग समुदाय पाठिशी आहे.

Karnataka Election Result 2023

Karnataka Election Result 2023

शिवकुमार ६२ वर्षांचे आहेत. त्यांनी प्रदीर्घ राजकीय अनुभव मिळवला आहे. शिवकुमार यांच्यावर आयटी, ईडी, सीबीआय खटले दाखल आहेत. त्यामुळं लवकरच विविध खटले, सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यांनी याप्रकरणी तिहारमध्ये तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. सिद्धरामय्या यांच्या तुलनेत जननेत्याची प्रतिमा कमी आणि अनुभवही कमी आहे.

सिद्धरामय्या यांच्यामुळं खर्गे, परमेश्वरांचं पद हुकलं

मल्लिकार्जुन खर्गे, डॉ. जी परमेश्वर यांसारखे ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्यामुळं मुख्यमंत्रीपदास मुकले होते. त्यांच्यासह बी. के. हरिप्रसाद, के. एच. मुनियप्पा यांचीही सिद्धरामय्या यांच्याविरोधात मते आहेत. दलित मुख्यमंत्री करण्याचे आवाहन काही कॉंग्रेस कार्यकर्ते करत आहेत, हा सिद्धरामय्या यांच्यासाठी मोठा धक्का आहे.