काँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात

वृत्तसंस्था
रविवार, 20 जानेवारी 2019

काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील इगल्टन रिसॉर्टमध्ये शनिवारी रात्री काँग्रेसचे आनंद सिंग आणि जे.एन गणेश हे दोन आमदार एकमेकांना भिडले. 

बंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील इगल्टन रिसॉर्टमध्ये शनिवारी रात्री काँग्रेसचे आनंद सिंग आणि जे.एन गणेश हे दोन आमदार एकमेकांना भिडले. 

कर्नाटकातील काँग्रेस इतर सर्व आमदार सध्या इगल्टन रिसॉर्टमध्ये आहेत. अशातच रिसॉर्टमध्येच आनंद सिंग आणि जे.एन गणेश दोन आमदारांत शनिवारी रात्री वाद झाला. या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं. कर्नाटकमधील राजकीय नाट्य अजूनही सुरूच आहे. भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याच्या चर्चेने काँग्रेस-जेडीएसच्या गोटात खळबळ उडाली आहे. अशातच आता काँग्रेसचे आमदार एकमेकांना भिडले आहेत. यानंतर मात्र, काँग्रेसने सारवासारव करताना म्हटले आहे की आनंद सिंग यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, काँग्रेसने शुक्रवारी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यासाठी काँग्रेसने 'व्हिप'ही बजावला होता. मात्र पक्षाचा आदेश धुडकावत चार आमदार गैरहजर राहिल्याने खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळूरूजवळच्या एका रिसॉर्टमध्ये हलवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजप 'ऑपरेशन लोटस' राबवत असल्याचं स्पष्ट झालं होतं. काँग्रेसचे आमदार गळाला लावण्याचे भाजपचे प्रयत्न होते. काँग्रेस आणि जेडीएस यांच्यामध्येही आलबेल नसल्याने भाजप त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. आता यातच ही घटना घडल्याने भाजपला आणखीनच बळ मिळेल.

Web Title: Karnataka Congress MLA in hospital after fight with another MLA at resort