काँग्रेसचे आमदार जाणार केरळमध्ये

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विशाखापट्टणम् व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा येथे या आमदारांना 'शरण' येण्याची ऑफर दिली आहे.

बंगळूर : कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना केरळला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तर, धर्मनिरपेक्ष दलही (जेडीएस) आपले आमदार आंध्र प्रदेशात हलविण्याच्या तयारीत आहे.   

राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना आज सकाळी शपथ दिल्यानंतर सत्तास्थापनेसाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता बहुमत मिळवण्यासाठी भाजपचे फोडफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपने काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांना मंत्रीपदाची व 100 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप काल (ता.16) कुमारस्वामी यांनी केला. त्यामुळे काँग्रेस व जेडीएसने आपापल्या आमदारांना अज्ञात स्थळी पाठवले आहे.   

या आमदारांना एका रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. पण आता तेथूनही त्यांना हलविण्याची चर्चा चालू आहे. या दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विशाखापट्टणम् व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा येथे या आमदारांना 'शरण' येण्याची ऑफर दिली आहे. पण, काँग्रेसने त्यांच्या आमदारांना केरळला पाठवण्याचे निश्चित केले आहे. केरळचे सरकार हे या आमदारांना सुरक्षित ठेवू शकते, असा विश्वास काँग्रेसला वाटतो. 

काल (ता. 16) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही भाजप आमच्या आमदारांना जाळ्यात ओढत आहे, असा आरोप केला होता. त्यामुळे येत्या 15 दिवसात कर्नाटकातील राजकारणाची सूत्रे झपाट्याने हालतील व सत्तास्थपनेसाठी जोरदार प्रयत्न केले जातील, त्यामुळे काँग्रेस आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.  

Web Title: karnataka congress mla shift to kerala