भाजपने 'ऑफर' दिलीच नव्हती; काँग्रेसच्याच आमदाराचा खुलासा

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

बंगळूर : कर्नाटक विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव्याच्या वेळी भाजपच्या बाजूने मतदान करावे म्हणून आपल्याला पैसा आणि मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात आल्याची ऑडिओ क्‍लिप बनावट असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार शिवराम हेब्बर यांनी काल (सोमवार) केला. त्यांच्या या दाव्यामुळे आमिषाबाबत ओरड करणाऱ्या काँग्रेसची पंचाईत झाली आहे. 

बंगळूर : कर्नाटक विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव्याच्या वेळी भाजपच्या बाजूने मतदान करावे म्हणून आपल्याला पैसा आणि मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात आल्याची ऑडिओ क्‍लिप बनावट असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार शिवराम हेब्बर यांनी काल (सोमवार) केला. त्यांच्या या दाव्यामुळे आमिषाबाबत ओरड करणाऱ्या काँग्रेसची पंचाईत झाली आहे. 

कर्नाटकात भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर मांडण्यात आलेल्या विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी आमदारांनी भाजपला मतदान करावे म्हणून भाजपने विरोधी आमदारांना पैसा आणि मंत्रिपदाची आमिषे दाखविल्याचा आरोप काँग्रेसने केला होता आणि त्याच्या समर्थनार्थ ऑडिओ क्‍लिपही जारी केल्या होत्या.

त्यातील एक हेब्बर यांच्या पत्नी आणि भाजपच्या नेत्यांमधील संभाषणाची होती. हेब्बर यांना पैसे आणि मंत्रिपद देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचे या क्‍लिपमध्ये म्हटल्याचा काँग्रेसचा दावा होता. येडियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र आणि त्यांचे सहकारी बी. जे. पुट्टुस्वामी हे दोघे फोनवरून हेब्बर यांच्या पत्नीला पैसा आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवित असल्याचे काँग्रेसचे म्हणणे होते. मंत्रिपद न देता 15 कोटी रुपये किंवा पाच कोटी रुपये आणि कॅबिनेट मंत्रिपद, अशी ऑफर हे दोघे क्‍लिपमध्ये देत असल्याचाही काँग्रेसचा दावा होता. 

या क्‍लिप बनावट असल्याचे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे कर्नाटक प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी आधीच स्पष्ट केले होते. 

क्‍लिपच्या खरेपणावर प्रश्‍नचिन्ह 
आज फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये हेब्बर यांनी या ऑडिओ क्‍लिपच्या खरेपणावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले असून, आपल्या पत्नीला असा कोणताही फोन आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. "हा माझ्या पत्नीचा आवाज नाही आणि तिला असा कोणताही फोन आला नाही. ऑडिओ टेप खोटी असून, मी या प्रकाराचा निषेध करतो,' असे हेब्बर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: Karnataka Congress MLA Shivaram Hebbar dismisses taped audio of his wife and BJP netas.