बहुमत सिद्ध करणारच : येडियुरप्पा 

yeddyurappa
yeddyurappa

बंगळूर : कर्नाटकच्या विधिमंडळात आज (सोमवार) आपण बहुमत सिद्ध करू असा विश्‍वास मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.

काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) मागील सरकारने तयार केलेले अर्थविधेयक कोणत्याही बदलाशिवाय विधिमंडळात सादर केले जाईल. सोमवारी आम्ही शंभर टक्के बहुमत सिद्ध करूच असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थविषयक विधेयक विधिमंडळात मंजूर होणे गरजेचे आहे; कारण त्याशिवाय आम्हाला राज्य कारभाराचा गाडा हाकता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

कर्नाटकमध्ये चौदा बंडखोर अपात्र 
कर्नाटकातील सत्तानाट्य पुन्हा एकदा नव्या वळणावर गेले आहे, विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी पक्षांतरबंदी कायद्याचा आधार घेत चौदा बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले. ही अपात्रता 2023 पर्यंत म्हणजे विधिमंडळाची मुदत संपेपर्यंत कायम राहील. यामुळे अपात्र ठरलेल्या एकूण बंडखोरांची संख्या सतरावर आली आहे. येडियुरप्पा हे आज (ता. 29) रोजी बहुमत चाचणीला सामोरे जात असतानाच रमेशकुमार यांनीही रविवारी बंडखोरांना अपात्र ठरवून नवा बॉंब टाकला. 

कॉंग्रेसच्या अकरा आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) तीन आमदारांवर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळली असून, रमेशकुमार यांनी आज घाईघाईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आम्ही उद्या सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे "जेडीएस'चे बंडखोर आमदार ए. एच. विश्‍वनाथ यांनी सांगितले. 

दोन दिवसांपूर्वी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असतानाच विधानसभा अध्यक्षांनी आज त्यांची राजकीय कोंडी केली. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयाचा येडियुरप्पा यांच्या सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेमुळे एकूण विधिमंडळाचे संख्याबळ घटून भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जाते. 

एकूण संख्याबळही घटले 
तत्पूर्वी कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानास वीस आमदारांनी दांडी मारल्याने कुमारस्वामी यांना पायउतार व्हावे लागले होते. आता कॉंग्रेसचे चौदा आणि "जेडीएस'चे तीन आमदार अपात्र ठरल्याने विधानसभा अध्यक्षांना वगळून सभागृहाचे संख्याबळ हे 207 वर आले असून, बहुमतासाठी जादुई आकडाही 104 वर आला आहे. ""मी माझ्या न्यायिक बुद्धीचा वापर करतच हा निर्णय घेतला आहे, या सगळ्या प्रकरणात मी शंभर टक्के दुखावला गेलो होतो,'' अशी भावनाही रमेशकुमार यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, भाजप विधानसभा अध्यक्षांवर अविश्‍वास ठराव आणण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसृत झाल्या असतानाच रमेशकुमार यांनी आज बंडखोरांना अपात्र ठरविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com