Karnataka Election 2023: 'या' काँग्रेस नेत्यांचा पराभव करण्यासाठी अमित शहांचा मास्टर प्लान; भाजप रणनितीकारांनी लावली ताकद I BJP Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Election 2023 Amit Shah

सिद्धरामय्या, शिवकुमार यांना पराभूत करून राज्यात काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती आहे.

Karnataka Election 2023: 'या' काँग्रेस नेत्यांचा पराभव करण्यासाठी अमित शहांचा मास्टर प्लान; भाजप रणनितीकारांनी लावली ताकद

Karnataka Assembly Election 2023 : दक्षिणेत कर्नाटकात एकमेव सत्ता असलेल्या भाजपला (BJP) कुठल्याही स्थितीत सत्ता राखण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यासाठी अमित शहा (Amit Shah) यांनी स्वतः राज्यात सर्व मतदारसंघांचा आढावा घेतला.

त्यांनी स्थानिक नेत्यांना विरोधी पक्षाच्या पाच प्रमुख नेत्यांच्या पराभवासाठी जोर लावण्याचे संदेश दिले आहेत. डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) व सिद्धरामय्या यांना आपल्या मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी त्यांना तुल्यबळ उमेदवार दिले आहेत.

या मतदारसंघात ते अडकून पडावेत, असा भाजपचा होरा होता. पण, शिवकुमार व सिद्धरामय्या (Siddaramaiah) दोघेही राज्यातील इतर मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत असल्याने भाजपच्या रणनितीकारांनी या दोन मतदारसंघात आणखी ताकद लावली आहे.

हे दोन नेते राज्यात फिरत असले, तरी तेथे अधिक शक्ती लावून त्यांना पराभूत करून विरोधकांना धक्का देण्याचे तंत्र योजले आहे. त्याला कितपत यश येते, हे पाहावे लागेल. वरूणा मतदारसंघात काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांना रोखण्यासाठी भाजपने मंत्री सोमण्णा यांना रिंगणात उतरविले आहे.

येथे सिद्धरामय्या यांना पराभूत करण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. सोमण्णा यांना या मतदारसंघात प्रचारालाही झगडावे लागत असल्याने अमित शाहा यांनी एक विशेष टीम येथे पाठविली आहे.

प्रियांक खर्गेंनाही भाजपनं केलं टार्गेट

कनकपू मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात त्यांच्याच समाजाचे वक्कलिग नेते आर. अशोक यांना भाजपने उतरविले आहे. अशोक यांना पद्मनाभनगर येथेही उमेदवारी दिली आहे. शिवकुमार यांना आव्हान देताना अशोक यांची दमछाक होत असून, त्यांच्या घरच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होत आहे.

तरीही तेथे अशोक यांनी जोराने प्रचार सुरू केला आहे. चित्तापूर मतदारसंघात प्रियांक खर्गे यांनाही भाजपने टार्गेट केले आहे. प्रियांक हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आहेत. येथे त्यांच्याविरोधात माणिकरत्न राठोड हे लढत आहेत.

जगदीश शेट्टरांना पराभूत करण्याचा निर्धार

याशिवाय हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून काँग्रेसकडून लढत असलेल्या जगदीश शेट्टर यांना पराभूत करण्यासाठी महेश टेंगिनकाई तर अथणीत काँग्रेसकडून लढत असलेले लक्ष्मण सवदी यांना पराभूत करण्यासाठी महेश कुमठळ्ळी यांना ताकद लावण्यासाठी राज्यातील नेत्यांना सांगितले आहे.

पाच मतदारसंघातून तीन संदेश

सिद्धरामय्या, शिवकुमार यांना पराभूत करून राज्यात काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती आहे. हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याने त्यांना रोखण्याचे प्रयत्न आहेत; तर प्रियांक खर्गे यांना पराभूत करून राष्ट्रीय पातळीवर खर्गे यांना शह देण्याचेही डावपेच भाजपचे आहेत.

शहा यांनी सवदी व शेट्टर यांना पराभूत करण्यासाठी जोर लावला. या दोन नेत्यांच्या पराभवातून भाजपच्या इतर नेत्यांना इशारा देणे, अशा तीन गोष्टींवर फोकस ठेवून अमित शहा यांनी या पाच मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे.