कर्नाटकचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपच्या हालचाली वाढल्या, JDS 'किंगमेकर'च्या भूमिकेत? Karnataka Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Assembly Election 2023

काँग्रेस आता कर्नाटकची जुनी काँग्रेस राहिलेली नाही. आम्ही आता विकसित झालो आहोत.

Karnataka Election : कर्नाटकचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपच्या हालचाली वाढल्या, JDS 'किंगमेकर'च्या भूमिकेत?

Karnataka Assembly Election 2023 : बहुतेक मतदानोत्तर सर्व्हेक्षणातून राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस (Congress) आणि भाजप दोन्ही पक्ष आतापासूनच पडद्यामागे जोरदार प्रयत्न करीत आहेत.

भाजप नेत्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, सरकार स्थापन करण्यासाठी बहुमतात कमी पडल्यास त्यांच्याकडून काँग्रेस आणि धजदमधून (JDS) निवडून आलेल्या आमदारांना भाजपात (BJP) आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र, काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद याला उत्तर देताना म्हणाले, ‘काँग्रेस आता कर्नाटकची जुनी काँग्रेस राहिलेली नाही. आम्ही आता विकसित झालो आहोत. आमच्या आमदारांची ‘शिकार’ करणे शक्य नाही.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल सतत एकमेकाच्या संपर्कात आहेत. लिंगायत नेते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने कर्नाटक काँग्रेसचे नेते उत्साहात आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि धजद नेते कुमारस्वामी म्हणाले की, आमच्या आमदारांना एकत्र ठेवले जाईल आणि मीच मुख्यमंत्री होईन. धजद नेतृत्वाला वाटते की, पक्षात अंतर्गत समस्या नसती, तर एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा जास्त जागा जिंकता आल्या असत्या.

काँग्रेस गोटात राजकीय हालचालींना जोर

बहुतांश मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये यावेळी काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असे अंदाज वर्तविले आहेत. स्पष्ट बहुमतासाठी काही जागांची गरज भासू शकते. यासाठी निकालापूर्वी काँग्रेसच्या गोटात राजकीय हालचाली सुरू आहेत. पूर्ण बहुमताशिवाय सरकार स्थापनेसाठी काही जागांची गरज भासली तर काय करता येईल, यावर काँग्रेस नेते गंभीर चर्चा करत आहेत. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी आज राजकीय सुमारे दोन तास चर्चा झाली असून काँग्रेस नेते आज संध्याकाळी बैठकीची दुसरी फेरी घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये डी. के. शिवकुमार यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

बहुमत मिळवून आम्हीच किंग बनू : बोम्मई

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोम्मई म्हणाले की, आम्ही आमच्या ताकदीवर सरकार बनवू. धजद किंगमेकर होणार नाही. पूर्ण बहुमत मिळवून आम्हीच किंग बनू,. भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याचा विश्वास आहे आणि पंतप्रधानांचा करिष्मा, सोशल इंजिनिअरिंग आणि त्यांच्या कामगिरीच्या जोरावर भाजपचे दुहेरी इंजिन सरकार पुन्हा सत्तेत येईल.

शिवकुमारांचा स्पष्ट बहुमताचा दावा

काँग्रेस १४६ जागांचा आकडा पार करेल, असे सांगून यावेळीही एकतर्फी विधानसभेची भविष्यवाणी करणाऱ्या एक्झिट पोलच्या निकालांवर आमचा विश्वास नाही, असे शिवकुमार सांगितले. ते म्हणाले, ‘‘मला एक्झिट पोलच्या आकडेवारीवर विश्वास नाही. आम्ही १४६ पेक्षा जास्त जागा जिंकू. लोक जागृत आणि सुशिक्षित आहेत. त्यांनी राज्याचे हीत लक्षात घेऊन मतदान केले आहे. कर्नाटकात ‘दुहेरी इंजिन’ निकामी झाले आहे’’