काँग्रेसच्या विजयाचे पडद्यामागचे शिल्पकार

कर्नाटक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बहुमत मिळविले
karnataka election Behind Congress victory G parmeshwar Shashikant Senthil Sunil Kanugolu MB Patil
karnataka election Behind Congress victory G parmeshwar Shashikant Senthil Sunil Kanugolu MB Patilsakal

बंगळूर : कर्नाटक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बहुमत मिळविले आहे. भाजपचा राज्यातील दक्षिणेकडील गड ढासळला आहे. काँग्रेसच्या या विजयात सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्याव्यतिरिक्त पडद्यामागे अनेक चेहरे सक्रिय होते.

काँग्रेस- धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीला २०१८मध्ये मिळालेली सत्ता बंडखोरीमुळे गमवावी लागली होती. या नाट्यात भाजपने सत्ता हस्तगत केली होती. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपला आव्हान देत काँग्रेसच्या बाजूने बाजी उलटविण्यात चार ‘चाणक्यां’नी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

एम.बी. पाटील : कर्नाटक काँग्रेसमधील लिंगायच चेहऱ्यांपैकी एक एम.बी. पाटील आहेत. पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेले पाटील हे कुमारस्वामी सरकारमध्ये गृहमंत्री होते. भाजपचे लिंगायत समाजातील मुख्य नेते जगदीश शेट्टर यांना काँग्रेसमध्ये आणण्यात पाटील यांचाच पुढाकार होता.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे ते निकटचे असून त्यांचे वडील बी.एम. पाटील हेही राजकीय नेते होते. काँग्रेसच्या धारदार प्रचारामागे एम.बी.पाटील यांचा हात होता. काँग्रेसच्या प्रचार समितीचे पाटील अध्यक्ष आहेत. काँग्रेसने यावेळी स्थानिक मुद्यांबरोबरच घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला होता. यामागेही पाटील यांचीच रणनीती असल्याचे मानले जात आहे. सोनिया गांधी यांनी चार वर्षांनंतर प्रथमच झालेली सभा हा पाटील यांच्या नियोजनाचाच एक भाग होता.

जी. परमेश्‍वर ः कर्नाटकमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यात प्रमुख सहभाग आमदार जी. परमेश्‍वर यांचा होता. या जाहीरनाम्यातील पाच आश्‍वासनांची खूप चर्चेत होती. ‘पीएफआय’बरोबरच बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेमुळे काँग्रेस अडचणीत सापडली होती. पण ६२ पानांच्या या जाहीरनाम्यातील अन्य आश्‍वासनांचा फायदा पक्षाला झाला.

परमेश्‍वर यांच्या नेतृत्वाखालील चमूने कर्नाटकातील विविध भागांसाठी वेगवेगळी आश्‍वासने दिली होती. ते १९८९मध्ये पहिल्यांदा आमदार बनले होते. प्रसिद्धीपरामुख परमेश्‍वर हे २०१८मधील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. १९९९मध्ये ते शिक्षण मंत्री होते तर २०१५मध्ये सिद्धरामय्या सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची जबाबदारी त्यांना दिली होती.

शशिकांत सेंथिल ः शशिकांत सेंथिल काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी आयएएस अधिकारी होते. कर्नाटक कॅडरचे आयएएस अधिकारी सेंथिल यांनी २००९ मधील निवडणुकीत काँग्रेसच्या वॉररूमचे प्रभारी म्हणून मुख्य भूमिका निभावली होती.२०१९मध्ये त्यांनी प्रशासकीय नोकरीचा राजीनामा दिला आणि २०२०मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

जुलै २०२२ मध्येच त्यांच्यावर ‘वॉररूम’ची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सेंथिल यांनी निवडणुकीदरम्यान एकेका जागेचा आढावा घेतला होता आणि वरिष्ठ नेत्यांना अहवाल पाठविले होते. सत्यतपासणीबरोबरच भाजप नेत्यांच्या विधानांवर उलटवार करण्यासाठी सेंथिल यांच्या नेतृत्वाखाली एक पथक काम करीत होते.

सेंथिल मूळचे तमिळनाडूचे रहिवासी आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना ते म्हणाले होते, की कर्नाटकमध्ये भाजप हिंदुत्वाच्या नावावर फूट पाडण्याचे राजकारण करीत होती. म्हणून मी ‘आयएएस’च्या नोकरीचा राजीनामा दिला.

सुनील कानुगोलू ः ‘डेटा ॲनालिसिस’मधील तज्ज्ञ अशी सुनील कोनुगोलू यांची ओळख आहे. २०२२ पासून ते कर्नाटक काँग्रेसच्या रणनीतीकारांपैकी एक समजले जातात. प्रचार, सर्वेक्षण आणि उमेदवारांची निवडीसाठीची रणनीती कोनुगोलू यांनी तयार केली होती.

ते बेल्लारीत राहतात. अमेरिकेत एमबीए केल्यानंतर ते २००९मध्ये भारतात परत आले. प्रख्यात रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ‘सिटिझन फॉर अकाउंटेबल गव्हर्नेस’ या संस्थेशीही ते जोडलेले आहेत. २०१४मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी ते नरेंद्र मोदी यांच्या प्रचारयंत्रणेत सहभागी झाले होते.

२०१७मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपसाठी राजकीय डाव तयार करण्यातही कोनुगोलू यांचा सहभाग होता. अकाली दलासाठीही त्यांनी २०२२मध्ये काम केले आहे. कर्नाटकसाठी प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा फिसकटल्यानंतर काँग्रेसने कानुगोलू यांच्याशी संपर्क साधला होता.

राज्यात ४० टक्कांचे सरकार, पे-सीएम आणि रेटकार्डसारख्या मोहिमेमागे कोनुगोलू यांचाच हात असल्याचे मानले जात आहे. काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यासाठीही त्यांची मदत घेण्यात आली होती. काँग्रेसने त्यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारीही सोपविली आहे. याचबरोबर २०२४मधील लोकसभेच्या निवडणुकीसाठी डावपेच आखणाऱ्या काँग्रेसच्या कृती दलाचे ते एक सदस्य आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com