कर्नाटकात पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस-धजदमध्ये युतीची शक्‍यता

कर्नाटकात पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस-धजदमध्ये युतीची शक्‍यता

बंगळूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणारी लोकसभा व विधानसभेची पोटनिवडणूक म्हणजे सत्ताधारी काँग्रेस-धजद युती व भाजपमधील वर्चस्वाची लढाईच ठरणार आहे. 

राज्यात भाजपच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी काँग्रेस व धजदमध्ये युतीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत; तर भाजपने पोटनिवडणूक जिंकून राज्यात वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न चालविला आहे. राज्यात युती सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या पाच महिन्यात होणारी ही पहिलीच पोटनिवडणूक आहे. पोटनिवडणुकीत युती पक्षांना यश आल्यास भाजपचा मुखभंग तर होईलच, शिवाय पुढील काळात ऑपरेशन कमळसारख्या हालचाली करणे अवघड होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच उद्देशाने काँग्रेस व धजदने पोटनिवडणुकीत विजय मिळवून राज्यात आपला प्रभाव सिध्द करून दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पोटनिवडणुकीत काँग्रेस, धजदची युती गृहित धरून निवडणुकीत युतीला धडा शिकविण्याचा व जनादेश आपल्या बाजूने असल्याचे दाखविण्यासाठी भाजपने डावपेच आखण्यास सुरवात केली आहे. पोटनिवडणुकीत विजय मिळविणारा पक्ष पुढील काळात राज्याच्या राजकारणात वर्चस्व स्थापन करण्यात यशस्वी होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस, धजद व भाजप या राज्यातील प्रमुख तीन पक्षाच्या दृष्टाने ही एक अग्नीपरीक्षा ठरणार आहे.

मंड्या, शिमोगा, बळ्ळारी या तीन लोकसभा व रामनगर व जमखंडी या दोन विधानसभेच्या जागांसाठी तीन नोव्हेंबरला निवडणूक जाहीर झाली आहे. त्या बरोबर तिन्ही प्रमुख पक्षांच्या हालचालीना वेग आला आहे. उमेदवारांची निवड व त्यांच्या विजयासाठी डावपेच आखण्यास सुरवात झाली आहे.

नेत्यांची अग्निपरीक्षा
पोटनिवडणुकीत प्रामुख्याने मुख्यमंत्री कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर व भाजपचे प्रदेशाध्याक्ष बी. एस. येडियुरप्पा यांची अग्नीपरीक्षा होणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपले कार्यक्षेत्र असलेल्या रामनगर मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराला विजयी करून आपले नेतृत्व खंबीर असल्याचे दाखवून देण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे. शिमोगा व बळ्ळारी येथील लोकसभा मतदारसंघ व जमखंडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना विजयी करून युती सरकारमधील आपले नेतृत्व उपमुख्यमंत्री परमेश्वर यांना सिद्ध करावे लागणार आहे. काँग्रेस व धजदचे लक्ष प्रामुख्याने शिमोगा लोकसभा मतदारसंघाकडे असणार आहे. या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व येडियुरप्पा यांचे पुत्र राघवेंद्र यांचा पराभव करण्यास विरोधक टपले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com