कर्नाटकात भाजपचा मुखभंग 

कर्नाटकात भाजपचा मुखभंग 

बंगळूर - कर्नाटकातील पोटनिवडणुकीत काँग्रेस - धजद युतीला भरघोस यश मिळाले. अपेक्षेप्रमाणे युतीने लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ एकच जागा टिकवून ठेवता आली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही मतदार संघात युतीचे उमेदवार विजयी झाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा (शिमोगा) व भाजपचे नेते श्रीरामलू (बळ्ळारी) तसेच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (मंड्या) विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने लोकसभेच्या तीन जागा रिक्त होत्या.

विधानसभा निवडणुकीत कुमारस्वामी दोन मतदारसंघातून विजयी झाल्याने त्यांनी रामनगर विधानसभा मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

जमखंडी विधानसभा मतदारसंघातील सिध्दू न्यामगौडा यांचे अपघाती निधन झाल्याने तीही जागा रिक्त होती. यासाठी लोकसभेच्या तीन व विधानसभेच्या दोन जागांसाठी तीन नोव्हेंबरला पोटनिवडणूक घेण्यात आली. त्याची मतमोजणी सोमवारी (ता.6) करण्यात आली.

निवडणुकीत धजदने आपल्या दोन्ही जागा टिकवून ठेवण्यात यश मिळविले. कॉंग्रेसने जमखंडी विधानसभेची जागा टिकवून ठेवली, तर बळ्ळारी लोकसभेची जागा भाजपकडून खेचून घेतली. भाजपने शिमोगा मतदारसंघाची जागा टिकवून ठेवली आहे, मात्र शिमोगा लोकसभा मतदारसंघाची जागा गमविली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोटनिवडणुक झाल्यांने या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. विशेष म्हणजे पोटनिवडणुकीत प्रथमच कॉंग्रेस-धजदने युती करून भाजपच्या विरोधात निवडणुक लढविली. भाजपने सर्व पाच जागांवरही उमेदवार उभे केले होते. कॉंग्रेस व धजदमध्ये जागा वाटप होऊन कॉंग्रेसने लोकसभा व विधानसभेची प्रत्येकी एक जागा लढविली होती, तर धजदने लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या एका जागेवर उमेदवार उभे केले होते. शिमोगा लोकसभेची जागा वगळता युतीने सर्व चार जागांवर विजय मिळविला. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरवात झाली.

प्रतिष्ठेच्या बळ्ळारी लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून होते. परंतु कॉंग्रेसचे व्ही. एस. उग्रप्पा यांनी सुरवातीपासूनच आघाडी मिळवून 2 लाख 14 हजार 826 मतांच्या फरकाने विजय मिळविला. भाजपच्या जे. शांता यांना पराभव पत्करावा लागला. 

मंड्या लोकसभा मतदारसंघ धजदचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येतो. येथे धजदचे एल. आर. शिवरामेगौडा 2 लाख 33 हजार 517 मतांच्या अंतराने विजयी झाले. भाजपच्या डॉ. सिध्दरामय्या यांना पराभूत व्हावे लागले. 

शिमोगा लोकसभा मतदारसंघ हा येडियुरप्पा यांचा बालेकिल्ला. या मतदार संघात त्यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी 
भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. अपेक्षेप्रमाणे 52,148 मतांच्या फरकाने त्यांनी धजदचे मधू बंगारप्पा यांचा पराभव केला. 

विधानसभेच्या दोन्हा जागांवर युतीच्याच उमेदवारांचा विजय झाला. रामनगर विधनसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी 109137 इतक्‍या मताधिक्‍याने विजय मिळविला. भाजपच्या चंद्रेशेखर यांना केवळ 15,906 मते मिळाली. त्यांनी निवडणूक केवळ दोन दिवसावर असताना निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर करून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

जमखंडी लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे आनंद न्यामगौडा 39480 मतांच्या अंतराने विजयी झाले. त्यांनी भाजपचे श्रीकांत कुलकर्णी यांचा पराभव केला. 

उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी 
विधानसभा निवडणूक 
जमखंडी 

आनंद न्यामगौडा (कॉंग्रेस)-97,017 (विजयी) 
श्रीकांत कुलकर्णी (भाजप)-57,537 

रामनगर 
अनिता कुमारस्वामी (धजद)-1,25,043 (विजयी) 
एल. चंद्रशेखर (भाजप)-15,906 

लोकसभा मतदारसंघ 
बळ्ळारी 

व्ही. एस. उग्रप्पा (कॉंग्रेस)-6,28,365 (विजयी) 
जे. शांता (भाजप)-3,85,204 

शिमोगा 
बी. वाय. राघवेंद्र (भाजप)-543306 (विजयी) 
मधू बंगारप्पा (धजद)-4,91,158 
महिमा पटेल (संजद)-5,278 

मंड्या 
एल. आर. शिवरामेगौड (धजद)-5,69,347 (विजयी) 
डॉ. सिध्दरामय्या (भाजप)-2,44,404 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com